भोकर :(रमेश गंगासागरे )
       
       उमरी येथील परस्पर विरोधी गुन्ह्यांमध्ये आज दिनांक 31 डिसेंबर रोजी भोकरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने वर्षाच्या शेवटच्या दिवशीच दोन्हीकडील आरोपींना जबर शिक्षा व दंड लावला आहे.

       
       घटनेबाबत समजलेली थोडक्यात माहिती अशी की, संजय कुलकर्णी हे श्रीनिवास अनंतवार यांनी केलेल्या अवैद्य बांधकामाबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे अर्ज दाखल केला होता, या अर्जावर दिनांक 2 एप्रिल रोजी सुनावणी असल्याच्या कारणाने ते दिनांक 2 एप्रिल 2013 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान नांदेडकडे कामानिमित्ताने आपल्या वाहनाने जात असताना, त्यांना 4 आरोपींनी उमरी तहसील कार्यालयाच्या समोर त्यांच्या गाडीच्या पुढे गाडी आडवी लावून गाडीची काच फोडली व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आरोपींनी पुन्हा न्यायालयाच्या समोरच मारहाण केली, तेव्हा संजय कुलकर्णी हे जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या न्यायालयात गेले, तिथे त्यांनी त्यावेळी न्यायालयात आपला जबाब दिला होता, त्यावरून उमरी पोलीस स्टेशन मध्ये  श्रीनिवास अनंतवार, पप्पू सावंत, शंकर सावंत, आणि इतर 1 यांच्या विरोधात कलम 307, 324, 325, 147, 148, 149, 120 व कलम 341,  427 प्रमाणे त्यांच्यावर दोषारोप करण्यात आले होते, उमरी न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग केले होते, ह्या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर, यांच्यासह श्री, किरण कुमार, कोळेकर गोवर्धन, यांनी तपास सादर करून न्यायालयात दोषारोपपत्र वर्ग केले होते.
       हे प्रकरण भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मुजीब शेख यांच्या कोर्टात चालले, आज या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने वरील आरोपींना कलम 324, 325, 341, 504 आणि 407 मध्ये दोषी ठरवून तीन वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
       तर श्रीनिवास अनंतवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयाने दोषी ठरवत  संजय कुलकर्णी, मल्लिकार्जुन चंदापुरे, मनोज कुलकर्णी, आणि साईनाथ मुटकुटवाड यांना  एका वर्षाची शिक्षा व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. हे प्रकरण उमरी येथील राजकारणाच्या द्वेष भावनेतून घडल्याची चर्चा आज न्यायालय परिसरात ऐकावयास मिळाली आहे. यातील सजा सुनावलेल्या सर्व आरोपींनी आज न्यायालयात जामीन मिळण्यासाठी आपल्या वकिलामार्फत अर्ज सादर केल्याने या जामीन अर्जावर संध्याकाळी उशिरापर्यंत सुनावणी चालू होती.