भोकर तालुक्यातील चिदगिरी येथे वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्या प्रकरणी चिदगिरीच्या महिला सरपंच सुशीला चव्हाण यांना सरपंच पदावरून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे.
वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे चिदगिरीच्या सरपंच सुशीला चव्हाण यांच्याविरूद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज-३) व १६ नुसार विवाद अर्ज वादी प्रविण चव्हाण यांनी दाखल केला होता. सदरील अर्जावर जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा
जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली. तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी नांदेड यांच्या अहवालावरून मौ. चिदगिरी येथील सिताराम नाईक तांडा व सुशीला विनोद चव्हाण सरपंच ग्रामपंचायत चिदगिरी हे गट क्र. २१७ मध्ये वनविभागाच्या जमिनीत व वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमण असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे सरपंच सुशीला चव्हाण यांनी वन जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ( ज ३) व १६ नुसार ज्या शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे, अशी व्यक्ती ग्रामपंचायतीचा सदस्य असणार नाही, अशी अधिनियमांत तरतुद आहे. सुशीला चव्हाण यांनी अधिनियमाचा भंग केला असल्याचे दिसून येत असल्याने वादी यांचा विवाद अर्ज मंजूर करण्यात आला आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहे. त्यामुळे चिदगिरीच्या सरपंच सौ. सुशीला चौहान यांना वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणामुळे सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
0 Comments