नांदेड : (अर्धापुर )
खोटे दस्ताऐवज तयार करून लाखो रुपये घरभाडे उचलणाऱ्या अर्धापुर पंचायत समितीच्या तब्बल ३१८ कर्मचाऱ्यांविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी १५६/३ सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करण्याचा निकाल अर्धापूर न्यायालयाचे न्यायाधीश एम.डी. बिरहारी यांनी दिला आहे. या कार्यवाहीत शिक्षक व ग्रामसेवक यांचा मोठा समावेश आहे. याप्रकरणी रविवारी रात्री अर्धापूर पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या शिक्षक व ग्रामसेवका विरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अर्धापूर पंचायत समिती अंतर्गत असलेले अनेक कर्मचारी विशेषतः शिक्षक व ग्रामसेवक मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलत असल्याची माहिती उघड झाल्यानंतर आर. टी. आय. कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी अनेक तक्रारी करून मुख्यालयी राहत नसल्याबाबत प्रशासनाला निदर्शनास आणून दिले होते. तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीसाठी टाळाटाळ होत होती.
आर. टी. आय. कार्यकर्ते सय्यद युनुस पार्डीकर यांनी दि. ८ जानेवारी २०२० रोजी मुख्यालयी न राहणाऱ्या व घरभाडे भत्ता नियमित उचलणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते. या दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी मिना रावताळे यांनी दिले होते. त्यावरून धरणे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
त्यामुळे दरम्यानच्या काळात आर. टी. आय. कार्यकर्ते पार्डीकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्याचे मुख्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, अर्धापूर पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार करून अर्धापूर पंचायत समिती कार्यालयातील ३१९ कर्मचारी मुख्यालयी न राहता खोटे दस्त सादर करून प्रति माह अंदाजे १४ ते १५ लाख रुपये प्रमाणे दरवर्षी दिड ते दोन कोटी रुपये शासनाकडून उचलत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र या प्रकरणी तक्रारकर्ते यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न होत होता. तरीही शासनाची फसवणूक करून घरभाडे भत्ता उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मंत्रालयापर्यंत केली. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
या प्रकरणी जेष्ठ विधिज्ञ अँड. ए. आर. चाऊस यांच्या माध्यमातून अर्धापूर न्यायालयात हे प्रकरण दि.३० मार्च २०२२ रोजी सय्यद युनूस यांनी दाखल केले होते. न्यायालयासमोर सर्व सत्य बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर ३१९ कर्मचाऱ्यांविरुद्ध दि. ७ जुलै २०२२ रोजी १५६/३ सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायाधीश एम. डी. बिरहारी यांनी दिले होते. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात कलम १६६, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव, राजेश घुमनर हे करत आहेत.
0 Comments