नांदेड (दि.) : येथून जवळच असलेल्या विमानतळ परिसरातील सांगवी बु. प्रभागात तब्बल एकोणीस (१९) तास वीज गुल होत असते, त्यामुळे लोकांना बोअर व टँकरचे देखील पाणी भरता येत नाही, यामुळे या प्रभागातील जनतेचे बेहाल होत आहेत.
         बुधवारी ८ जूनच्या रात्री नऊ पासून वादळ वारा सुरु झाला आणि त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला, याबत फ्यूज कॉल सेंटरला कितीही कॉल लावा, फोन बिझी आहे असेच सांगण्यात येते आणि ३३ के. व्ही. उपकेंद्रात देखील कुणी फोन उचलत नाही आणि उचलले तरी अरेरावीची भाषा वापरण्यात येते. यामुळे परिसरातील जनता हवालदिल झाली आहे.
          बुधवारी रात्रभर आणि गुरुवारी देखील दुपारपर्यंत वीज गुल होती. रात्री नऊला गेलेली वीज दुसऱ्या दिवशी तब्बल एकोणीस तासाने सायंकाळी चार वाजता आली. याची कुठे ना दाद, ना फिर्याद ! अधिकारी मनावर घेत नाहित आणि लाईन स्टाफ चिरीमिरी वसूल करण्यात गुंग आहेत. येथील तंत्रज्ञ सुर्यवंशी हे तर असून नसल्यासारखे आहेत. वीज पुरवठा बंद झाला की ते आपला फोन बंद करुन टाकतात. त्यांना फक्त "वसुलीत" स्वारस्य असल्याचे दिसून येते.
          पावसाळा पूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे वेळीच न केल्यामुळे सध्या वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. सांगवी हा प्रभाग नांदेड महानगर पालिकेत समाविष्ट असून देखील एखाद्या खेड्यासारखी या प्रभागाची दुरवस्था झाली आहे. नगर सेवक नावाचे प्राणी आता फक्त निवडणुकीत उगवतात की काय अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे सांगवी प्रभागात वीज, सडक, पाणी हे परवलीचे शब्द झाले आहेत.