भोकर :( प्रतिनिधी)
ग्रामीण भागाचा विकास मोठया प्रमाणात व्हावा या साठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आसला तरी 31 मार्च अखेर कामे पूर्ण होणे बंधनकारक असताना शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत काही ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत राहिलेली आहेत, तर अनेक विहिरींची कामे यंत्राद्वारे करण्यात आली, कांही ठिकाणी कामं मात्र अद्यापही चालुच आसल्याचे चित्र दिसून येत आहे.
भोकर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच रस्ते विकासासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून विकासकामांचा ध्यास घेतला आहे. ग्रामपंचायत अंतर्गत गावाचा विकास होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला, त्यामध्ये गावामध्ये पेवर ब्लॉकची कामे व सि. सि. रस्त्याचे कामे घेण्याचे निश्चित करण्यात आले. 31 मार्च अखेर सदर कामे पूर्ण करण्याचे आदेशही होते त्यानुसार अनेक ग्रामपंचायतीने धडपड करून कामे उरकण्याचा प्रयत्न केला यामुळे कामाचा दर्जा म्हणावा तसा राहिलेला नाही. काही ग्रामपंचायती अंतर्गत कामे अपूर्णच राहिली 31 मार्च अंतर्गत मोजमाप पुस्तिका तयार झाली मात्र कामे अद्यापही चालू असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
4 ग्रामपंचायतींना 3 कोटी 20 लाखाचा निधी
भोकर तालुक्यातील भोसी जि. प. गटातील भोसी व रिठा ह्या दोन ग्रामपंचायतींना प्रत्येकी 80 लाख रुपयाचा निधी पेवर ब्लॉक व सि.सी. रस्त्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आला. तसेच पाळज जि.प. गटा मधील किनी व पाळज ह्या दोन ग्रामपंचायतींना प्रत्येकी 80 लाख रुपयाचा निधी पेवर ब्लॉक व सी.सी. रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला, मात्र सदर ठिकाणची कामे प्रत्यक्षात दर्जेदार झाली का? कामाचा दर्जा कसा आहे? कामे प्रत्यक्षात 31 मार्चपर्यंत कामे पूर्ण झाली का?,31 मार्च नंतर अपूर्ण कामे असतानाही एम. बी. करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत, बऱ्याच ठिकाणी 31 मार्च नंतर कामे अद्यापही चालू असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत असताना मात्र म. ग्रा. रो. ह. यो अंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदर कामाचे मोजमाप पुस्तिका तयार केली आहे, हा मात्र गंभीर प्रकार दिसून येतो.
तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींना देखील मग्रारोहयो अंतर्गत पेवर ब्लॉक व सीसी रस्त्यासाठी 407 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला, तसेच भोसी, रिठा व पाळज, किनी या चार गावांना विशेष करून प्रत्येकी 80 लाख रुपयाचा निधी मग्रारोहयो अंतर्गत देण्यात आला, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्या नंतर विकासात्मक दृष्टीने कामाचा दर्जा चांगला राहणे अपेक्षित आहे, तालुक्यातील भोसी ग्रामपंचायत अंतर्गत मग्रारोहयो चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असून प्रत्यक्षात जे मजूर मस्टर वर दाखवण्यात आले ते कामावर नाहीत तसेच बाहेरील मजूर आणून काम करून घेण्यात येते अंदाज पत्रका नुसार काम करण्यात येत नाही, हलक्या दर्जाचे बोगस पद्धतीने काम करण्यात येत असल्याची तक्रार भोसी येथील कपिल दिगंबर कल्याणकर, संतोष आकेमवाड शहाजी कल्याणकर यांनी गटविकास अधिकारी भोकर यांच्याकडे दि. ४ एप्रिल रोजी केली होती, मात्र याची चौकशी करण्यात आली नाही, त्यानंतर पुन्हा 19 एप्रिल रोजी कपिल दिगंबरराव कल्याणकर व संतोषअकेमवाड, यांनी गटविकास अधिकारी भोकर यांना निवेदन देऊन सदर निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
भोकर तालुक्यात मग्रारोहयो कामाच्या नियमांची पायमल्ली करण्यात येत असून तहसील कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी व त्यांच्यासोबत काम करणारी यंत्रणा ह्या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. संबंधित योजनेअंतर्गत त्या गावातील मजुरांना काम मिळावे हा हेतू आहे मात्र गावातील मजुरांना काम मिळणे दूरच राहिले मस्टरवर नाव टाकून प्रत्यक्षात दुसऱ्याच मजूरा कडून काम करून घेतल्या जाते, खोटे मजूर दाखवल्या जातात, बाहेरगावचे मजूर आणून गुत्तेदारी पद्धतीने काम उरकल्या जाते, अंदाजपत्रकानुसार काम न करता बोगस पद्धतीने काम करून शासनाची दिशाभूल करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे, मटेरियल हलक्या दर्जाचे वापरून कामे उरकण्यात येत आहेत, कामांचा दर्जा मात्र संबंधित अधिकारी पाहत नाहीत कार्यालयात बसून देयके काढण्यासाठी तयारी करीत असतात काही कामांची देयके कामे होण्यापूर्वीच केली जातात हा गंभीर प्रकार भोकर तालुक्यात होत असताना या गंभीर प्रकाराची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
0 Comments