भोकर :(दि.18 एप्रिल )
      रमेश गंगासागरे

     आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनामध्ये विद्यार्थी आळशी होत चालले असून मैदानी खेळापेक्षा मोबाईल वरील खेळाकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे अभ्यासाबरोबरच उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी मैदानी खेळाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन निवृत्त शिक्षक श्री आठवले सर यांनी केले, ते भोकर येथील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह संमेलनामध्ये बोलत होते. यावेळी मंचावर माजी गटशिक्षणाधिकारी श्रीमती निलावार मॅडम, माजी शिक्षक श्री विजापुरे सर, माजी शिक्षक श्री दरबस्तवार सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. "माझी शाळा कन्या शाळा" या नावाने  व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र येणाचे कार्य आयोजकांनी केले होते,  केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेच्या 1987- 88 च्या माजी विद्यार्थ्यांनी हा हृदय स्पर्शी सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता.
       आठवले सर पुढे बोलतांना म्हणाले की, आजचा विद्यार्थी शारीरिक विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेक प्रकारच्या व्याधीने ग्रासले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी योगासने आणि मैदानी खेळाकडे सुद्धा लक्ष देऊन आपले आरोग्य सांभाळले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले, 
       दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी भोकर शहरातील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कन्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व माजी शिक्षकांचे स्वागत आगळ्या वेगळ्या रुपात गुलाब पुष्पवृष्टी करून टाळ्यांच्या गजरा मध्ये केले, त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हसते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व माजी शिक्षकांचे स्वागत शाल-श्रीफळ ट्रॉफी(मोमेंटो), पुष्पहार आणि पुस्तक भेट देऊन झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शहनाज बेगम या माजी विद्यार्थ्यांनीने केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कन्या शाळेतील बालपणीच्या विविध आठवणी सांगून सर्वांना चकित केले, तसेच पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम आयोजित केल्याचा उद्देश त्यांनी यात स्पष्ट केला, प्राथमिक कच्या विद्यार्थ्यानचा पाया मजबूत करणाऱ्या शिक्षकांचा आजकाल कोणीच आदर सत्कार करताना दिसून येत नाही, पण आम्ही मुद्दामहून आमचा प्राथमिक पाया मजबूत करणाऱ्या या सर्व माजी शिक्षकांचा आदर सत्कार करत आहोत, असे त्या यावेळी म्हणाल्या, तसेच कार्यक्रमांमध्ये महिला गटविकास अधिकारी श्रीमती निलावार मॅडम यांनीसुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये होत असलेले चढ-उतार आणि आजचे बदलत चाललेले विद्यार्थी यावर प्रकाश टाकला, शिस्तीला आणि वेळेला महत्त्व देणारे शिक्षक श्री विजापुरे सर यांनीसुद्धा आपल्या मनोगतामध्ये विविध 40 वर्षापूर्वीच्या आठवणीवर प्रकाश टाकला, त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना आजही आपण प्राथमिक शाळेमध्ये बसून शिक्षण घेत असल्याचा अनुभव आल्याचा भावना अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानंतर पत्रकार रमेश गंगासागरे यांच्याकडे व्यक्त केल्या. रियाजोदिन  शेख सर यांनी सौदी अरेबिया येथून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या, सदरील कार्यक्रमांमध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांना उपस्थित शिक्षकांच्या हस्ते पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला, कार्यक्रमासाठी पुणे, बुलढाणा, कंधार, नांदेड, आंध्र प्रदेश तेलंगाना, माहूर आदी दूर ठिकाणाहून विद्यार्थी आले होते. चाळीस वर्षानंतर माजी विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट घडवून आणल्याबद्दल सर्वांनी आयोजकाप्रती आभार व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे माजी विद्यार्थी तथा पत्रकार रमेश गंगासागरे यांनी केले, तर आभार माजी विद्यार्थी तथा सहशिक्षक श्री,कबीरदास गंगासागरे यांनी केले, कार्यक्रमामध्ये अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत आणि भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर सामूहिक सहभोजनाचा कार्यक्रम संपन्न होवून सायंकाळी 4:30 वाजता, कार्यक्रमाची सांगता झाली.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी कन्या शाळेचे माजी विद्यार्थी पत्रकार रमेश गंगासागरे, मा.नगरसेवक डॉक्टर पुरुषोत्तम कल्याणकर, सहशिक्षक कबीरदास गंगासागरे, पद्माकर पवार, संजय दरबस्तवार, सुनील जाधव,डॉ. शहेनाज बेगम आदींनी परिश्रम घेतले.