उमरी :(दि.5 मार्च )
गंगाधर सवई/रमेश गंगासागरे
सहाशे वर्षांपूर्वी समतेच्या राज्याची संकल्पना मांडणाऱ्या गुरु रविदासांच्या स्वप्नातील "बेगमपूर शासन व्यवस्था" साकार करण्यासाठी चर्मकार व तमाम बहुजन समाजाने संघटित व्हावे असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातील उमरी (स्टेशन) येथे गुरु रविदास मिशनच्या वतीने आयोजित गुरु रविदास महाराज यांच्या ६२४ व्या आणि छ. शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती महोत्सवात साहित्यिक व परखड वक्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते बालाजी सुर्यवंशी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
गुरु रविदास चौक, रापतवार नगर, उमरी येथे आयोजित या कार्यक्रमात पुढे बोलताना इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर म्हणाले की, गुरु रविदास यांनी जातिव्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारले होते. दैववाद आणि कर्मकांड नाकारुन सामाजिक समतेचा संदेश त्यांनी दिला. समतावादी राज्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. "बेगमपुर" म्हणजे दुःख विरहित शासन व्यवस्था निर्माण झाली पाहिजे यासाठी त्यांनी बहुजन समाजाला गुलामीचा त्याग करुन स्वाभिमानी व संघटित होण्याचे आवाहन केले होते.
शिकल्या सवरलेल्या लोकांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे यथायोग्य पालन करावे, ज्या समाजात आपला जन्म झाला, त्या समाजाकडे मागे वळून पहावे, सामाजिक चळवळीला गतिमान करावे, तरच आपल्या महामानवांची स्वप्ने साकार होऊ शकतील असेही शेवटी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर म्हणाले.
याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून राहूल खंदारे यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले. चौदाव्या शतकात गुरु रविदासांचा झाला तसाच अपमान आज शिवाजी महाराजांचा करण्यात येत आहे. रामानंद हे गुरु रविदासांचे तसेच रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, हे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी लक्षात घ्यावे असा इशारा राहुल खंदारे यांनी यावेळी दिला.
यावेळी ऍड. भीमराव सवई, विठ्ठल वाघमारे, बाल वक्ते कु. कृष्णा साईनाथ सुर्यवंशी, कु. वैष्णवी राजू गायकवाड, कु. गायत्री बालाजी सुर्यवंशी, कु. पूजा कबीरदास सुर्यवंशी, कु. राधिका प्रकाश अन्नपूर्णे, कु. स्वरुपा संतोष नामेवार, कु. त्रिषा संभाजी गंगासागरे, चि. शिवकुमार संभाजी गंगासागरे, कु. अनुश्री शरद मदनवाड यांनीही आपले विचार मांडले. इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर लिखित पुस्तके आणि वही- पेन देऊन बालवक्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
साहेबराव सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर सूत्रसंचलन प्रकाश करकले यांनी केले. मंचावर उमरी येथील नगरसेवक साईनाथ जमदाडे, पत्रकार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाधर सवई, पत्रकार संजय कोलते (दै. देशोन्नती प्रतिनिधी, मुदखेड), कैलाश सोनकांबळे (दै. एकमत प्रतिनिधी, उमरी), नागेश भालके, राजेश वाघमारे (नायगाव), नागा सुर्यवंशी, प्रकाश अहिले, दत्ता सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. संतोष सुर्यवंशी यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.
गुरु रविदास चौक
कार्यक्रमाच्या प्रारंभी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते रापतवार नगरच्या मुख्य चौकातील गुरु रविदास चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महामानवांच्या नावाने गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. स्नेहभोजनानंतर जयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली.
0 Comments