संपादकीय....!!
              दोन महिन्यापासून भोकर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत या अपघातामध्ये आतापर्यंत अनेक जणांना किरकोळ दुखापत झाली आहे तर अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यास जबाबदार सी.सी. रोड ? का इंजिनियर ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
       किनवट रोड आता पूर्णपणे वाहतूकीस तयार झाला आहे, पूर्वी या रोडवर डांबरीकरण केलेले होते आता सदरील रस्त्याचे रुंदीकरण झाले असून ह्या रस्त्यावर डांबरीकरण ऐवजी सिमेंट काँक्रीट केलेले आहे. डांबरीकरण केलेल्या रोडवर वाहने जास्त वेगाने धावत नव्हती त्यामुळे अपघात सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात घडून आले नाहीत. आता भोकर ते हिमायतनगर पर्यंत सिमेंट काँक्रीट असल्यामुळे वाहनधारक धूम स्टाईल वाहने पळवत आहेत, त्यामुळे अचानक वाहना समोर कोणी आल्यास ब्रेक लावणे कठीण जात आहे, डांबरीकरण नसल्यामुळे वाहन रस्त्यावर तात्काळ थांबत नाही असे अनेक वाहनचालक म्हणत आहेत, सिमेंट काँक्रीटचा रोड टायरची पकड घेत नसल्यामुळे वाहन जागेवर थांबत नाही असे अनेक वाहनचालक म्हणत आहेत, हे कितपत खरे आहे, हा संशोधनाचा भाग आहे. त्यामुळे काही प्रमाणात अपघाताची संख्या वाढली आहे. असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. मागील महिन्यामध्ये उमरी रोडवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. नांदेड रोड वर सुद्धा अपघात झालेले आहेत, यास रोड कारणीभूत आहेत का वाहन चालक? की इंजिनिअरिंग फेल झाली आहे? हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. उमरी रोड वरील भौगोलिक स्थिती बघितली तर कैलास गडा कडून येणारा बायपास रोड अत्यंत उताराचा झालेला आहे, उतारा लगतच मुख्य चौरस्ता तयार झाला आहे, त्यामुळे वरून येणाऱ्या वाहनाचे ब्रेक लागत नाही आणि मुख्य चौका जवळच वळण रस्ता असल्यामुळे रोडवरील वाहन, वाहन चालकाला दिसत नाहीत, त्यामुळे याठिकाणी चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपघाताची मालिका चालू झालेली दिसून येत आहे. त्याठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता  असल्याची नागरिक बोलताना दिसत  आहेत.
          तसेच नव्याने जाणाऱ्या भोकर मुदखेड रोड वर अनेक वळणे असल्यामुळे ह्या रोडवर सुद्धा वाहतूक सुरळीत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची दाट शक्यता आतापासूनच वर्तविली जात आहे त्यामुळे रस्ता तयार होण्याच्या अगोदर वळण रस्ते कमी करुन सरळ रस्ता करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे भोकर तालुका हा अपघात तालुका म्हणून भविष्यात ओळखला जाऊ नये तसेच भोकर विकास प्रेमींचे म्हणणे आहे.