भोकर : (दि.24 फेब्रुवारी)
   रमेश गंगासागरे
       भोकर तालुक्यात मागील एका महिन्याच्या कालावधीपासून उमरी रोड आणि किनवट रोडवर जणू अपघातांची मालिका सुरू झालेली दिसून येत आहे. या अपघातांमध्ये अनेक जणांचे बळी गेलेत तर अनेक जण जखमी झाल्याच्या नोंदी सरकारी दप्तरी जमा झाली आहे. तशातच आज मोघाळी जवळ कार आणि ऑटोच्या धडकेत दोघे जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उमरी येथील सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
       आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उमरी  वरून पॅसेंजर घेऊन भोकर कडे येणारा ऑटो क्रमांक एम.एच. 26 T 6141 यास भोकर कडून उमरीकडे जाणारी लाल रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक टि.एस 08 FR 8483 ही उमरी कडे भरधाव वेगात जात असताना मोघाळी जवळ ऑटोला धडक दिली. या धडकेत ऑटोमधील दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ 108 क्रमांकाच्या ॲम्बुलन्स मधून उमरी येथील सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे. दैव बलवत्तर म्हणून दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही वाहनांचेही काही प्रमाणात किरकोळ नुकसान झाले आहे.