भोकर ते उमरी कुठे पण घ्या भिंगरी

भोकर (22 जानेवारी)
    रमेश गंगासागरे
        भोकर तालुक्यामध्ये भिंगरी नावाची देशी दारू कुठेही  आणि कधीही हमरस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्याशा हॉटेलमध्ये सहजपणे भेटत असल्याने छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
       परवानाधारक देशी दारू विक्रेत्यांनीच अधिकृत दुकानांमधून देशी दारू विक्री करावी असा नियम असताना भोकर तालुक्यामध्ये ह्या नियमाला फाटा फोडून अनेक हॉटेल चालक भोकर ते उमरी राज्य रस्त्याच्या लगत असलेल्या प्रत्येक बसस्टॉपवर सहजपणे देशी दारू ग्राहकांना उपलब्ध  करून देत आहेत. सदरील छोटे दुकानदार हे त्या हॉटेल मधून पेट्रोलची पण विक्री करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सदरील दुकानदाराना ज्वलनशील पेट्रोल विक्री आणि देशी दारू विक्रीचा परवाना कोणी दिला असा सवाल सुजाण नागरीक करत आहेत. 
        उमरीला जाईपर्यंत रस्त्याच्या लगत असलेल्या हॉटेलमध्ये मिळत असलेली देशी दारू पिऊन अनेक वाहनधारक आपली वाहने बेसुमार पणे चालवत  आहेत. त्यामुळे उमरी भोकर रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. छोट्या दुकानदारांना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू विकणाऱ्या व्यक्ती कोण त्यांना शोधून कार्यवाही केली जावी अशी मागणी होत आहे. दारू सहजतेने मिळत असल्याने अनेक तरुण व्यसनाधीन बनत चालले असून एखादा मोठा अपघात होण्या आगोदर अवैधरित्या दारू व पेट्रोलची विक्री करणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.