भोकर :(दि.10 जानेवारी)
रमेश गंगासागरे
तालुक्यातील मौजे जामदरी येथील स्वस्त धान्य दुकाना मध्ये सरपंच, माजी सरपंच व काही शासकीय नोकरदार यांची नावे अंत्योदय योजनेत समाविष्ट असणे व स्वस्त धान्याचे योग्य वाटप न करणे याबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून जिल्हा पुरवठा अधिकारी श्री लतीफ पठाण यांनी संबंधित दुकानाची अनामत रक्कम शंभर टक्के जप्त केल्याचा आदेश दिला आहे.
भोकर तालुक्यातील जामदरी येथील स्वस्त धान्य दुकानदार धर्माजी विठ्ठल बाशेट्टी यांनी आपला मुलगा, तसेच सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, काही जमीनदार व्यक्ती, काही शासकीय नोकरदार यांची नावे अंत्योदय यादीमध्ये समाविष्ट करून धान्य वाटप केल्याचे दाखवीत होते. याप्रकरणी ग्रामस्थांनी सदरील प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्या नुसार भोकर तहसील कार्यालयाकडून नायब तहसीलदार रेखा चामणर (पुरवठा) यांनी गावात जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली, व केलेल्या चकशीचाअहवाल तहसील कार्यालयास पाठवला. तहसीलदार भोकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे संबंधित अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी श्री,लतीफ पठाण यांनी सदर प्रकरणी आदेश करून जामदरी येथील स्वस्त धान्य दुकानदार धर्माजी विठ्ठल बाशेट्टी यांची अनामत रक्कम 100% जप्त करण्यात आल्याचा आदेश दि. ६ जानेवारी २०२२ रोजी दिला आहे.
तालुक्यात इतर काही गावांमध्ये देखील अशा प्रकारची नावे आहेत, अंत्योदय योजनेमध्ये श्रीमंत मंडळीची नावे टाकण्यात आलेली आहेत आणि ज्यांना प्रत्यक्ष लाभ मिळायला पाहिजे अशा लोकांची नावे मात्र नाहीत, असा प्रकार असून पुरवठा विभागाने अशा प्रकरणाची चौकशी केल्यास सत्य बाहेर येऊ शकते.
0 Comments