अर्धापूर : (दि.3 जानेवारी )
रमेश गंगासागरे
प्रत्येक कुटूंबात मुलगा जन्माला आला की, मोठा गाजावाजा करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला जातो. परंतु अर्धापूर तालुक्यातील लोणी (बु.) येथील सोनटक्के परिवारात मुलगी जन्माला आली. आणि या परिवाराने मोठा गाजावाजा करित संपूर्ण गावभर ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत केले. तसेच गावभर फिरून जिलेबी आणि मिठाईचे वाटप केले. या उपक्रमाची लोणी परिसरात चर्चा होत असून या उपक्रमाचे गोडकौतुक होत आहे.
समाजातील मुलीचे रक्षण आणि संगोपन व्हावे यासाठी मुलगा आणि मुलगी एकसमान मानुन शासनाने स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध कायदा करून मुलीचे रक्षण केले आहे. तरीही काही समाज कंटकाकडून मुलाचा हट्ट धरून मुलगी जन्माला येण्याअगोदरच गर्भातच तिचा जीव घेण्याचे पाप करित आहेत. किंवा एखाद्या मातेला नको असताना मुलगी झाली तर त्या निरपराध मातेचा मानसिक, शारीरिक छळ केला जात असल्याच्या अनेक घटना घडतात. अशाही परिस्थितीत लोणी (बु.) येथील बालाजी पुरभाजी सोनटक्के यांच्या कुटुंबात त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर बालाजी सोनटक्के यांच्या घरी दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी एका गोंडस मुलीने जन्म घेतला. घरी मुलगी झाल्याची बातमी कळताच मुलीचे वडील ज्ञानेश्वर सोनटक्के, आई सौ. नेहा ज्ञानेश्वर सोनटक्के यांच्यासह कुटूंबातील सर्व सदस्यांना अतिशय आनंद झाला. या परिवाराने मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत केले. या नवजात मुलीचे आपल्या घरी दि. ३१ डिसेंबर रोजी आगमन होताच गावातील प्रमुख रस्त्याने ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून संपूर्ण गावात तीन क्विंटल जिलेबी मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी मुलीचे आजोबा बालाजी सोनटक्के, आजी शकृतंलाबाई सोनटक्के, वडील ज्ञानेश्वर सोनटक्के, काका अमोल सोनटक्के, आत्याबाई सोनटक्के परिवारातील नातेवाईक, गावातील नागरिक सुनिता देशमाने, वनिता गंधारे यांच्यासह तरूण, तरूणी, नवयुवक, महिला व पुरुष या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
0 Comments