भोकर:(दि.22 डिसें.)
  रमेश गंगासागरे

भोकर उमरी रोडवर असलेल्या हाळदा बसस्थानका समोर उमरी कडून येणाऱ्या भरधाव कारचा व भोकर कडून येणाऱ्या दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात होऊन दुचाकीवरील तरुण व तरुणी  गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. 
  याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक २१ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हाळदा बसस्थानकासमोर उमरी कडून येणारी स्विफ्ट डिझायर कार जिचा क्रमांक एम.एच.२६ बि.सी.२६३० व भोकर कडून उमरी कडे जाणारी दुचाकी जिचा क्रमांक टी.एस.१६ई - वाय ९०१५ यांची समोरासमोर जोराची धडक होऊन दुचाकीवरील एक पुरुष व एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.         स्थानकाजवळील ग्रामस्थांनी अपघात घडताच तात्काळ 108 ला फोन करून ॲम्बुलन्स गाडीला बोलावून जखमींना पुढील उपचारासाठी भोकरकडे रवाना केल्याने संबंधीत जखमीची नावे समजू शकली नाहीत. या अपघातातील कार उमरी कडून भोकर मार्गे नांदेड कडे जात होती तर दुचाकी भोकर कडून तेलंगणा राज्यातील बोधन कडे जात होती. तसेच या दुचाकीवरील अपघातात जखमी झालेले दोघेही नात्याने बहिण भाऊ असल्याचे सांगत होते. अशी माहिती प्रत्यक्षदर्शी काही ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
      भोकर ते उमरी रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण झाले असल्याने हा रस्ता एकदम गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून येणारी जाणारी वाहने तुफान गतीने जात येत असतात. हाळदा बसस्थानकाजवळ जिल्हा परिषद केंद्रीय शाळा असून या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांची सदैव वर्दळ असते. तसेच नागरिकांचीही ये-जा चालू असते. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी  अनेक दिवसापासून ग्रामस्थ करीत आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या पुढेही अशा अनेक गंभीर अपघाताच्या घटना घडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी हाळदा स्थानकाच्या आजूबाजूला गतिरोधक बसून होणारे अपघात कमी करावेत, अशी मागणी पुनश्च ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे.