भोकर :(दि.14 डिसें.)
   रमेश गंगासागरे

   फाशी पारधी समाजाच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी वरून भोकर शहरातील मुख्य रस्त्यावर दहशत पसरली असून फाशी पारधी समाजाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक करून तसेच हातात तलवार, काट्या घेऊन एकमेकावर चाल करण्याच्या उद्देशाने धावून जात असल्याने नागरिक घाबरून गेले आहेत.
     घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की आज दिनांक 14  रोजी दुपारी एक वाजल्यापासून तहसील जवळील भोकर नगर परिषदेच्या जुन्या इमारती जवळ पारधी समाजातील 30 ते 40 जणांच्या दोन गटामध्ये कोणत्यातरी कारणावरून तडजोड चालू होती, सदरील तडजोड चालू असताना दोन गटांमध्ये थोड्या थोड्या अंतराने वाद विवाद मोठमोठ्याने चालू होते, त्यामुळे दुपारी एक वाजल्यापासून 2 गटामध्ये काहीतरी अपरिचित घटना घडू शकते, असे नागरिक अंदाज वर्तवित होते. आणि दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान तेच घडले. फाशी पारधी यांच्या दोन गटातील वाद विकोपाला गेल्याने दोन्ही समाजातील तरुण, महिला, व  वृद्ध, हातामध्ये मिळेल त्या अवजाराने एकमेकांवर वार करू लागले. तसेच हे दोन्ही गट भोकर पंचायत समिती, स्टेट बँक ऑफ इंडिया च्या समोरून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, किनवट रोड कडे दगडफेक करत जात होते, त्या दगडफेकी मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील अनेक दुचाकीचे नुकसान झाल्याचे वृत्त हाती आले आहे. सदरील दगडफेक चालू असताना रस्त्यावरील अनेक नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत जाताना दिसून आले. आंबेडकर चौकाच्या पुढे हे दोन गट दगडफेक करून जात असताना भोकर पोलिसांना सदर घटनेची खबर लागताच त्यांनी फाशी पारधी याच्या दोन्ही गटाचा पाठलाग करून काही फासेपारधी लोकांना पकडल्याचे कळते. वृत्त लिहीपर्यंत सदरील घटनेबाबत भोकर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू  असल्याचे कळते.