भोकर:(दि.22डिसें.)
   रमेश गंगासागरे

              नागरिकांच्या शासन स्तरावरील विविध अडीअडचणी प्रमाणपत्रे कर्ज दवाखाना शिक्षण वीज ग्रामपंचायत तहसील अशा 19 विभागाअंतर्गत व संबंधित कार्यालयांतर्गत येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी तसेच नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी उद्या दिनांक 23 डिसेंबर रोजी गुरुवारी भोकर तालुक्यातील नागापूर येथे सकाळी 9 वाजता प्रशासन आपल्या गावी उपक्रमाचा शुभारंभ पार पडणार आहे.
       महाराष्ट्र शासन निर्णय आणि जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार भोकर तालुक्यामध्ये विविध मंडळांमध्ये "प्रशासन आपल्या गावी" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या नागापूर येथे पार पडणार आहे. यासाठी नागापूर येथे 9 ते 5 या वेळामध्ये तहसील वीज वितरण कंपनी शाळा बँक दवाखाना यांच्यासारख्या 19 विभागातील कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांची उपस्थिती प्रामुख्याने राहणार असून 9 ते 5 या वेळामध्ये नागापूर गावातील नागरिकांच्या शासन स्तरावरील विविध अडचणींचा निपटारा या वेळेमध्ये करण्यात येणार आहे. नागरिकांनी सदरील वेळेमध्ये उपस्थित राहून आपल्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवाव्यात तसे आवाहन करण्यात आले आहे.