नांदेड :(दि.12 नोव्हेंबर)
     रमेश गंगासागरे

बिलोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांना बुधवारी (दि. १०) दुपारी उपसभापती शंकर यंकम यांनी सभापती निवासस्थानी बंद खोलीमध्ये डांबून मारहाण केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात उपसभापती यंकम यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व अन्य विविध कलमाखाली गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         बिलोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांना बुधवारी उपसभापती शंकर यंकम यांनी शासकीय कार्यालयातून सभापती निवासस्थानी बोलून घेतले. फोन बंद ठेवून काय केतोस, नागरिकांचे कामे का करत नाहीस? असे म्हणून त्यांना सभापती निवासस्थानातील खोलीत डांबून धक्काबुक्की करून मारहाण केली व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, अशी तक्रार नाईक यांनी दाखल केली होती. त्यावरुन बिलोली पोलीस ठाण्यात उपसभापती यंकम यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व अन्य विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बीडीओ नाईक यांना मारहाण झाल्याचे तीव्र पडसाद शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत उमटले. यंकम यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळया संघटनांनी कामबंद आंदोलन करत घटनेचा निषेध नोंदवला, तसेच गुन्हा दाखल झाला असला तरी उपसभापती यंकम यांना अटक न केल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटना गुरुवारी एकवटल्या होत्या. या घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्हा परिषदेत आंदोलन केले तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात यंकम यांचे सदस्यत्व रद्द करावे, गटविकास अधिकारी नाईक यांना पोलिस संरक्षण द्यावे. अशी मागणी करण्यात आली. आपण वाचत आहात भोकर न्युज लाईव्ह तसेच यंकम यांना अटक न केल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा आणि शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला. यावर गटविकास अधिकारी केशव गडापोड. श्रीकांत बळदे, तुकाराम भालके यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंदोलनात जिल्हा परिषद कर्मचारी  युनियन (ओंकार प्रणित) संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड, जिल्हाध्यक्ष प्रवीण थोरवटे, जिल्हा सचिव सिद्धार्थ हातीअंबीरे, कार्याध्यक्ष राघवेंद्र मदनुरकर कोषाध्यक्ष पवन तलवारे,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष धनंजय वडजे, सचिव हनुमंत वाडेकर, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सांख्यिकी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष जी. एस. पांडलवाढ, कार्याध्यक्ष सुधीर सोनवणे, सचिव डी.के. आडेराव, सहसचिव योगेश वाघ, महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य सांख्यिकी संघटना जिल्हाध्यक्ष  कुंटरवार, शेख बाबू मौलासाब,यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. निषेध आंदोलनाचे सूत्रसंचलन आर.डी. मदनूरकर यांनी केले.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.