रमेश गंगासागरे

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि आठवी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असून या परीक्षेकरीता भोकर तालुक्यात एकूण १२४८ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. तालुका शिक्षण विभागाकडून या परीक्षेकरिता संपुर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ. डी एस मठपती यांनी दिली आहे. राज्य शिक्षण परिषद मार्फत परीक्षा ही 23 मे रोजी घेण्यात येणार होती परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घसरण पाहता सदर परीक्षा १२ ऑगस्ट रोजी घेण्यास शिक्षण परिषदेकडून मान्यता मिळाली आहे. तालुक्यात इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेकरीता  ९२४ तर  पाचवी परीक्षेसाठी 324 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी एकूण १५ परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आले असून १५केंद्र संचालक तसेच पर्यवेक्षक, रनर आदी एकूण 85 शिक्षक कर्मचाऱ्यांची याकामी निवड करण्यात आली आहे. सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत आणि दुपारी ०१.३० ते ०३.०० वाजेपर्यंत अशा दोन सत्रामध्ये ही परीक्षा होणार आहे. सर्व परीक्षा केंद्रावर कोविड -१९  च्या अनुषंगाने काळजी घेतली जाणार आहे. सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. 
तालुक्यातील सर्वच पालक व शिक्षकांनी या परीक्षेसाठी १०० टक्के  विद्यार्थ्यांना उपस्थीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन गट शिक्षणाधिकारी डॉ. डी. एस.मठपती यांनी केले आहे.