रमेश गंगासागरे
        राष्ट्रीय भर्ती एजन्सी अर्थात NRA ह्या गुगल सर्च इंजिन वर तयार करण्यात आलेल्या एका बनावट कंपनीने देशभरातील सुशिक्षित बेरोजगारांना सरळ सेवा भरतीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे आता उघड झाले आहे यात नांदेड जिल्हा व भोकर तालुक्यातील असंख्य सुशिक्षित बेरोजगार यांचा समावेश आहे.
       अनेक वर्षापासून सरकार भरती प्रक्रिया पूर्ण करत नसल्याचे पाहून अनेक सुशिक्षित बेरोजगार नोकरीपासून वंचित राहिले आहेत तर काहींचे वय संपत आले असल्याने ते नोकरी मिळविण्याच्या नादात ऑनलाईन फसविले जात आहेत याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. मागील एक महिन्यापासून सर्वात सर्च केल्या जाणाऱ्या गुगल सर्च इंजिनवर राष्ट्रीय भर्ती एजन्सीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगार युवकांकडून नाव नोंदणीच्या नावाखाली 400- रुपये प्रति व्यक्ती या दराने नोंदणी करून घेण्यात येत होती. नाव नोंदणी नंतर अवघ्या काही दिवसातच विना परीक्षा सरळ सेवा भरती देण्यात येत असल्याची हमी सदरील कंपनी देत असल्याने मोठ्या प्रमाणावर बेरोजगार युवक 400/- रुपये देऊन नाव नोंदणी करून घेत होती, युवकांची वाढती संख्या पाहून ही कंपनी 30 जानेवारी रोजी शेवटची तारीख दिलेली असतानाही पुन्हा 10 फेब्रुवारी पर्यंत शेवटच्या तारखेत वाढ करण्यात आली, असल्याने लाखो युवक फसले असून त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुबाडणूक झाल्याचे समोर आले आहे. अनेक युवकांनी यशस्वीरित्या ऑनलाइन पेमेंट केलेले असले तरीही कंपनीकडून तुमचे पेमेंट झाले नाही, पुन्हा पेमेंट करण्यात यावे या आशयाचा ईमेल अनेक युवकांना येत होता, त्यामुळे अनेकांना ह्या कंपनीबाबत शंका निर्माण झाली होती ,आता तर ही कंपनी रातोरात बंद झाली असल्यामुळे तसेच कोणत्याही युवकांच्या संपर्कात ही कंपनी नसल्यामुळे ही कंपनी फेक (बोगस) कंपनी निघाली असून या कंपनीस कोणाची मान्यता होती? त्यांना भारताची राजमुद्रा, आर.बी.आय चा फोटो आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा फोटो वापरण्याची परवानगी कोणी दिली ? हे शोधणे महत्त्वाचे झाले आहे. ती गूगल सर्च इंजिनवर प्रथम क्रमांकावर कशी आली? हे शोधणे सायबर क्राईम ब्रँच पुढे आव्हान ठरले आहे. फसगत झालेल्या युवकांच्या पैशाचे काय होणार? त्यांना परत पैसे मिळतील काय ? फसवणूक केलेल्या कंपनीवर गुन्हा दाखल होईल का ? असे अनेक प्रश्‍न सुशिक्षित बेरोजगार युवक करत आहेत.
         युवकांना फसवण्यासाठी लुटारू नवीन नवीन युक्त्या लढवत असल्याने त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी आणून कठोर शिक्षा करावी व कडक कायदा करावा अशी मागणी युवक वर्गातून केली जात आहे.

          ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा