नायगांव ता.प्र./गंगाधर गंगासागरे
दिनांक ८ जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील खतगाव शिवारात जळालेल्या आवस्थेत मृतसापडलेल्या अनोळखी माणसाची ओळख पटली असून मयताच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या साथीने त्याचा खून केल्याच्या रहस्याचा उकल देगलूर पोलीसांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या मदतीने केला आसल्याचे उघड झाले आहे.
खतगाव शिवारात दिनांक ९ जानेवारी रोजीची पहाट झालेल्या नंतर एका पेट्रोलपंपाच्या शेजारी एक मृतदेह सापडला. हा माणूस ३५ ते ४० वयोगटातील होता. रामतिर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव पुरी यांनी घटनास्थळी केलेल्या पहाणीनंतर या माणसाला ८ आणि ९ जानेवारीच्या रात्री मारून टाकले असावे असा संशय आला. त्याला कोठे तरी दुसरीकडे मारले असेल आणि खतगाव शिवारात आणून टाकले असेल असा पोलीसांचा त्यावेळी कयास होता. महादेव पुरी यांनी सामाजिक प्रसार माध्यमे आणि बातम्यांच्या माध्यमाने या अनोळखी मयत माणसाची ओळख पटविण्याचे आवाहन जनतेला केले होते. या रस्यमय खूनाचा उलगडा अत्यंत गंमतीदारपणे उघड झाला.
दिनांक १४ जानेवारी रोजी एक महिला देगलूर पोलीस ठाण्यात आली आणि आपला नवरा ८ जानेवारीपासून गायब असल्याची माहिती पोलीसांना देत होती. याबद्दल पोलीसांनी मिसींग अहवाल दाखल करावा अशी अपेक्षा त्या महिलेची होती. देगलूरचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांना या महिलेच्या बोलण्यातून संशय आला. कारण ८ तारखेपासून घरातून गायब असलेल्या नवऱ्याची माहिती पोलीस ठाण्याला देण्यासाठी ती १४ जानेवारी रोजी आली होती. या नंतर महिलेला पोलीसांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे समाधानकार पणे देता आले नाहीत. त्यामुळे देगलूर पोलीसांनी त्या महिलेला आपल्याकडे थांबून ठेवले आणि पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना याबद्दलची माहिती दिली. तेंव्हा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना देगलूरला पाठविण्यात आले आणि मग या खूनाच्या गुन्ह्याचा रहस्यमय उलगडा झाला.
९ जानेवारीला सापडलेला अनोळखी मयत माणूस खानापूर येथील रामा शिवाजी येन्नलवार हा आहे. प्राप्त माहितीनुसार त्याची पत्नी आणि नरंगल येथील प्रकाश राचप्पा स्वामी यांचे आपसात अनैतिक संबंध आहेत. दोन -तीन महिन्यापुर्वी मयत रामा येन्नलवारची पत्नी प्रकाश स्वामी सोबत निघून गेली होती आणि ती हैद्राबाद येथे राहत होती. रामा येन्नलवारने त्यांना शोधले आणि पत्नीला परत खानापूर येथे आणले. त्यानंतर रामा येन्नलवार आणि प्रकाश स्वामी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रामा येन्नलवारची पत्नी त्याला सोबत घेवून ऍटोने देगलूर येथे आली आणि नंतर प्रकाश स्वामीच्या चारचाकी वाहनात ते इकडे-तिकडे फिरत असतांना एका जागी गाडी थांबवून त्याच्या डोक्यात दांडूक्याने मारण्यात आले. रामा येन्नलवार खाली पडला तेंव्हा मारेकऱ्यांनी त्याला पुन्हा गाडीत टाकले. गाडीत रक्त पडू नये याची दक्षता घेतांना त्याच्या डोक्याला कपडा बांधला आणि खतगाव शिवारात आणून त्याचे प्रेत जाळून टाकले. पोलीसांनी प्रकाश स्वामीची चार चाकी गाडी सुध्दा ताब्यात घेतली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी प्रकाश स्वामी, रामा येन्नलवारची पत्नी रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव पुरी यांच्या ताब्यात देण्यात असून आरोपिंना दिनांक १५ रोजी बिलोली न्यायालयात हजर केले आसता न्यायालयाने सदर आरोपिंना दिनांक १९ जानेवारी पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील तपास सुरु आसल्याची माहीती सपोनि महादेव पुरी यांनी दिली .
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments