भोकर : रमेश गंगासागरे

      भोकर तालुक्यातील मौजे जामदरी व जामदरी तांडा येथे काही नागरिक मागील अनेक वर्षापासून अवैद्य देशी, विदेशी दारूसह रसायन मिश्रित शिंदीची विक्री करत असल्याने वैतागलेल्या महिलांनी अखेर भोकर येथील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षक यांना लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन गावात विक्री होत असलेली अवैध दारू बंद करावी अशी मागणी केली आहे.
       महिला बचत गटातर्फे आणि प्रतिष्ठित नागरिकांतर्फे देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मौजे जामदरी गाव व जामदरी तांडा हे निर्मल ग्राम पुरस्कार गाव म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे, तसेच हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झाले असून इथे अध्यात्मिक गुरुकुल टेकडी व आश्रम आहे, या आश्रमाच्या परिसरा जवळच गावातील व्यक्ती अवैध दारू व रसायनमिश्रित शिंदीची विक्री करत आहेत, ह्या रसायनमिश्रित शिंधी व दारूच्या सेवनाने गावातील एक मुख्याध्यापक, एक शेतकरी व एक तरुण असे तीन व्यक्ती मयत झालेला आहेत, तसेच आता दारूच्या आहारी अनेक विद्यार्थी व लहान मुले जात असल्याने, गावाची शांतता अबाधित राहत नाही, अनेकांच्या घरांमध्ये भांडणे लागत आहेत, त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी आठ महिला बचत गट व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सह्यांचे निवेदन भोकर येथील वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहे, आता हे वरिष्ठ अधिकारी या निवेदनावर कोणती भूमिका घेतात हे पाहणे योग्य ठरेल.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा