नायगांव : (ता.प्र.) गंगाधर गंगासागरे
       भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नायगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र गंगनबिडच्या पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून परंपरेनुसार श्रावण महिण्यात दर सोमवारी भरण्यात येणारी यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.
       कोरोनामुळे अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा यात्रोत्सव बंद करण्यात आला असून,हे संकट दूर करण्यासाठी शंभू महादेवाला परिसरातील भक्तांकडून साकडे घालण्यात आले आहे.
      सध्या गंगनबिड येथील महादेव मंदिरात दररोज शंभू महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करून मंदिर बंद करण्यात येत असून,भक्तांना मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. श्रावण महिण्यात दरवर्षी गंगनबीड येथे हजारो भक्तगण नायगांव  तालुक्यासह जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. श्रावणातील दर सोमवारी पंचक्रोशीतील प्रत्येक कुटुंबातून एखादा तरी व्यक्ती या ठिकाणी दर्शनासाठी जातो. नवसाला पावणारा महादेव अशी आख्यायिका या शंभू महादेवाची असून, हिरव्यागार नटलेल्या शालूनी उंच डोंगर माथ्यावरील मंदिराच हे स्थान सर्वांना मोहित करून टाकणारं आहे त्यामुळे गर्दी होत असते .
      यंदा श्रावण महिना 21 जुलैपासून सुरू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी यात्रा उत्सव स्थगित केले आहेत. यानुसार यंदा श्रावण महिण्यात श्रीक्षेत्र गंगनबिड परिसरात दर्शनासाठी येऊ नये . असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष शंकर जाधव, उपाध्यक्ष महाजन आलेवाड, सचिव गंगाधर मोरे, पोलीस पाटील बालाजी आलेवाड, देविदास तोटेवाड, रावसाहेब मोरे, मारोती कोलमवाड, जळबाजी गोंदले, प्रभू जाधव यांच्यासह गंगनबीड येथील संपूर्ण गावकऱ्यांनी केलं आहे.
       कोरोना काळात हे मंदिर मागील ३ महिण्यापासून बंद ठेवले होते. देशासह जिल्ह्यात देखील कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीचे ठिकाणे नियंत्रित करण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार संस्थानने हा निर्णय घेतला आहे.

            नागरिकांनी  घरुनच दर्शन घ्यावे
                               -- आर.एस. पडवळ

      कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये श्रीक्षेत्र गंगनबीड महादेव मंदीर परीसरात भरणारी श्रावण महिन्यातील यात्रा बंद ठेवण्यात आली आहे. मंदीराकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत .
     तरी मंदिर परिसरात कुणीही दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन नायगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.एस. पडवळ यांनी केले आहे.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर click करा.