भोकर :(रमेश गंगासागरे ) तालुक्यातील प्रतिष्ठित जेष्ठ माजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गंगाधरराव काशीराम कळसकर वय ८५ वर्षे यांचे वार्धक्याने अल्पशा आजारात पुणे येथे दिनांक २९ जून २०२० रोजी रात्री ८ वाजता निधन झाले.
   
       त्यांच्या पार्थिवावर दिनांक ३० जून रोजी सकाळी आठ वाजता पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ,३ मुली, एक मुलगा, सून असा परिवार असून ते इंजिनियर योगेश कळसकर यांचे वडील होत.
त्यांनी मातुळ येथील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून अनेक वर्ष गोरगरीब रुग्णांची मनोभावे  सेवा केली. त्यामुळे त्यांची ग्रामीण भागात गरिबांचे कैवारी म्हणून ख्याती पसरली होती. त्यांनी तब्बल ४५ वर्ष गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यात घालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच ग्रामीण भागातील जनतेत मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
     भोकर शहरात त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहरातील डॉक्टर असोसिएशन व केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे एका शोकसभेचे आयोजन करण्यात येऊन त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अव्याहतपणे केलेल्या रुग्ण सेवेचा सर्वांनी गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. फेरोज इनामदार,केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश्‍वर रेड्डी, डॉ.यु.एल.जाधव,डॉ. साईनाथ वाघमारे, डॉ.राम नाईक, डॉ. हूलसुरे,डॉ. किरण पांचाळ, डॉ. विजयकुमार दंडे,डॉ.मारावार,डॉ.सो.अनिता नाईक, डॉ.सौ.टप्पे, साईनाथ पदमावार,डॉ. जाधव, आदीसह अनेकांची उपस्थिती होती त्यानंतर सर्व डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद करून शोक दिन पाळला.
     इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा