उमरी :(रमेश गंगासागरे )  महाराजांची हत्या करणाऱ्या चोर माथेफिरूला तेलंगाना येथून काही तासातच उमरी पोलिसांनी जेरबंद केले असून त्याला  गजाआड केले आहे. महाराजांची हत्या झाल्याचेे समजताच संबंध गावकऱ्यांनी एकत्र येऊन आरोपीस जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत महाराजांचे शव ताब्यात घेतले जाणार नसल्याचा पवित्रा घेतला होता त्यामुळे पोलिसांनी युद्धपातळीवर आरोपीचा शोध घेऊन गजाआड केले आहे.
आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले
       शिवसंस्कृतीचे प्रचारक आणि उमरी तालुक्यातील नागठाना मठाचे मठाधिपती बालतपस्वी श्रीगुरू निर्वाणरूद्र पशुपती शिवाचार्य महराजांची शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास लिंगायत धर्माच्याच एका धर्मभ्रष्ट माथेफिरूने गळा दाबुन हत्या केली. सोमनाथ लिंगाडे असे या माथेफिरूचे नांव असुन, महाराजांची हत्या केल्यानंतर तो फरार झाला आहे.
    महाराजांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर अलेले नाही. मात्र घटनेच्या पार्श्वभूमी नुसार महाराज नेहमी प्रमाणेच आपल्या रूममध्ये रात्री आराम करत असतांना रात्री १ च्या सुमारास सोमनाथ लिंगाडे याने महाराजांच्या रूममध्ये प्रवेश करून तेथील महाराजांच्या पूजेसाठी असणार्‍य चांदीच्या काही वस्तु, सोनची अंगठी आणि काही रोख रक्कम एका पिशवीत भरली. महाराजांना याची कुणकुण लागल्यानंतर ते जागे झाले असता लिंगाडे याने गळा दाबून महाराजांची हत्या केली. घटनेनेतर आरोपी सर्व वस्तु घेऊन महाराजांची गाडी घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असतांना मठाच्या परिसरात असणार्‍या लोकांनी त्याला पकडले परंतु त्यांने तेथील लोकांवर चाकुहल्ला करून तेथेच असेलेल्या एका दुचाकीवरून पोबारा केला.
    दरम्यान, तेथील जमावाने महाराजांना रूग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर गावचे सरपंच शिवाजी पचलिंग, पोलिस पाटील आणि अन्य काही मान्यवरांनी उमरी पोलिस ठाण्यात सदरील घटनेबाबत कळवले. उमरी पोलिसांनी या घटनेची रितसर नोंद घेऊन महाराजांचे शव शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवून दिले. या घटने दरम्यानच, गावातील एका वेडसर व्यक्तीचे शव देखील मठाच्या मागील भागात पोलिसांना मिळून आले. दोन्ही घटनांचा पंचनामा करून उमरी पोलिसांनी आरोपी सोमनाथ लिंगाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची पार्श्वभूमी
    बालतपस्वी निर्वाणरूद्र पशुपती शिवाचार्यांनी नागठाना गावचा पूर्ण कायापालट करून तेथे विविध सुविधा आणि शासनाच्या योजना कार्यान्वीत केल्या होत्या. त्यामुळे केवळ वीरशैव धर्मातच नव्हे तर या परिसरातील अठरापगड जातीधर्मामध्ये निर्वाणरूद्र पशुपतींना मोठे आदराचे स्थान होते. नुकताच त्यांनी गोशाळेचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी प्रशास्त असे बांधकामही केले. या बरोबरच महाराजांनी मठामध्ये गेल्या काही वर्षापासून अन्नछत्र देखील सुरू केले होते. आरोपी सोमनाथ लिंगाडे हा नेहमी मठामध्येच असायचा. अन्नछत्रात नियमितपणे भोजन घ्यायचा. कधी कधी मठामध्येच मुक्कामाला देखील असायचा. सोमनाथ हा लिंगायत समाजाचा असला तरी तो मुळातच गुंड वृत्तीचा असल्याचे गावातील ग्रामस्थांनी सांगीतले. महाराजांच्या दैनंदिन व्यवहाराचा पूर्ण अभ्यास असलेल्या सोईनाथने शेवटी आपला डाव साधलाच. शनिवारी मध्यरात्री मठामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने केलेल्या योजनेचा शेवट महाराजांच्या हत्येने झाला. निष्कलंक ब्रम्हचारी, कुशाग्रबुध्दीचा समाजसेवक, शिवसंस्कृतीच्या उपसकाचा अशा दुर्दैवी अंत व्हावा ही घटनाच मुळी मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या हत्येने संपूर्ण उमरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
       उमरी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून अवघ्या काही तासातच आरोपीला तेलंगणा येथून अटक केल्याने उमरीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अशोक अनंतरे यांचे अभिनंदन होत आहे, आरोपीस अटक केल्यानंतर उद्या त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली असलेल्या home' वर क्लिक करा