नांदेड :(रमेश गंगासागरे )  येथील विष्णुपुरी भागात असलेला सरकारी दवाखाना हा पूर्णतः प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हातात असल्याने त्यांच्याकडून कोरोना सारख्या महाभयंकर रोगावर  इलाज करणे शक्य नसल्याचा अनुभव तिथे जाऊन आलेले रुग्ण सोशलमीडियामधून  व्यक्त करताना दिसून येत आहेत.

       अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष  तथा इंजिनियर श्री चंद्रप्रकाश देगलूरकर हे त्यांना सर्दी आणि ताप असल्याकारणाने परवा शनिवारी विष्णुपुरी येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक तपासणीसाठी गेले असता तिथे त्यांना प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून अत्यंत वाईट अनुभव आला असल्याने त्यांनी सोशल मीडिया मधून तेथील दवाखान्याकडे लक्ष देण्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांना विनंती केली आहे.
       सोशल मीडियावर  व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये इंजिनियर  चंद्रप्रकाश देगलूरकर म्हणतात की, कोणताच डॉक्टर रुग्णां सोबत आस्थेवाईकपणे विचारणा करण्यास तयार नाही, तसेच  काही एक बोलण्यास डॉक्टर तयार नाहीत, सदरील सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी ह्यांच्याच तोंडावर मास्क लावलेले दिसून आले आहे, बाकी रुग्ण तोबा गर्दी करत असून कोणत्याच रुग्णाच्या तोंडावर  मास्क  दिसून येत नाही,  दवाखान्यात ही  मास्क मिळत नाही, ह्या दवाखान्याला कोरोना सारख्या रोगाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे, विचारणा करण्यात आलेले डॉक्टर म्हणतात की, तुम्हाला कोरोन दिसत आहे, काही डॉक्टर म्हणतात की, तुम्हाला फक्त सर्दी ताप आहे, मी गोळ्या लिहून देतो, त्या तुम्हाला बाहेरून घ्याव्या लागतील, आमच्याकडे सर्दी तापीच्या गोळ्या मिळत नसतात, घरी जाऊन काही दिवस आराम करा. शेवटी ते असेही लिहितात की माझ्यासारख्या सुशिक्षित इंजिनीयरला ह्या दवाखान्यात एवढ्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे तर सामान्य रुग्णांची काय हालत असेल त्याची कल्पना न केलेली बरी त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी सदरील रुग्णालयाकडे तात्काळ लक्ष देऊन इथे होणारी रुग्णांची हेळसांड दूर करावी अशी त्यांनी शेवटी विनंती केली आहे.
       विष्णुपुरी येथील सरकारी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी असून यापूर्वी सुद्धा येथील कर्मचाऱ्यांकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अत्यंत वाईट अनुभव आलेल्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत, आता तर कोरोना सारखा महाभयंकर रोग सगळीकडे पसरलेला असताना ह्या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, ही अत्यंत गंभीरतेने घेण्याची बाब असल्याचे अनेक जण बोलत आहेत.