भोकर/उमरी : (रमेश गंगासागरे ) उमरी ते भोकर रस्त्याचे काम सध्या संथ गतीने चालू असून या रोडचे लेवल अद्याप जैसे थे असल्याने या रोडचे काम करणारे इंजिनियर सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
![]() |
| संग्रहित छायाचित्र |
मागील 2 वर्षापासून उमरी ते भोकर रस्त्यावर रुंदी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या रस्त्यावर चालू असलेले पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, तसेच ज्या ठिकाणी रस्ता तयार झाला तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार झाल्यामुळे अनेक वाहनधारकांना वाहने चालवताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, डांबरीकरणाचा दर्जाही अत्यंत निकृष्ट स्वरूपाचा असल्याने ह्या रोडवर बऱ्याच ठिकाणी गिट्टी उघडी पडली आहे, रोड ची दबाई योग्य प्रमाणात केलेली नाही, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली नाली ही सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची तयार होत असून या नालीमध्ये वाळू ऐवजी दगडाचा चुरा आणि भुसा मिश्रित करून तयार केल्या जात असल्याने ह्या नालीचे वयोमान अल्प स्वरूपाचे असल्याची चर्चा सगळीकडे होत आहे. तर भोकरच्या जवळ बनवण्यात आलेली नालीत रोडचे पाणी जात नसून रोड पेक्षा उंच हे नाली झालेली दिसून येत आहे.
जिथे उंच टेकडी आहे, तो भाग खोदून काढून सपाट करण्यात यावा असे सक्त आदेश असतानाही सदरील गुत्तेदारने तो भाग जसाच्या तसा उंच ठेवून काही ठिकाणी सखल रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करून थातुरमातुर स्वरूपाचा रोड तयार केल्याने अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत, याकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा भोकर शहरात होत आहे. रोड तयार करताना सदरील गुत्तेदार यांनी प्रमाणित गिट्टीचा वापर अल्प प्रमाणात केला आहे, तर रोडच्या काही भागात निकृष्ट दर्जाचा मुरूम, माती टाकून लेवल करण्याचा केविलवाणा प्रयोग केल्याचे दिसत आहे, त्यामुळे या रोडचे आयुष्य अल्प दिवसच असल्याची चर्चा भोकर आणि तालुक्यातील नागरिक करत आहेत.

0 Comments