पूर्णा / कावलगाव :(रमेश गंगासागरे)  चौदाव्या शतकातील महामानव गुरु रविदास यांचे समतेचे तत्वज्ञान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात समाविष्ट केले, त्यामुळे आज आपले संपूर्ण जीवन बदलले आहे. कांही लोकांना हे देखवत नाही, म्हणून ते संविधान बदलण्याची भाषा बोलत  आहेत. संविधान बदलले तर तो गुरु रविदासांचा अपमान ठरणार आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आम्ही संविधान बदलू देणार नाही असे विचार अ.भा. गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केले.
          कावलगाव ता. पूर्णा जि. परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या गुरु रविदास महाराज यांच्या ६२२ व्या जयंती महोत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. सरपंच बालाजीराव वाघमारे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
          आपल्या दिड तासाच्या ओघवत्या व्याख्यानात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, गुरु रविदास यांनी केलेले महान कार्य लोकांसमोर येऊ नये म्हणून त्यांच्या नावाचे, चित्राचे आणि चरित्राचे विडंबन सनातनी व्यवस्थेने केले. या व्यवस्थेचा बदला घेण्याऐवजी आमची माणसे या व्यवस्थेची गुलाम होत आहेत. पोथी, पुराण, पंचांग आणि ब्राह्मणांच्या आहारी जाऊन सर्व विधी त्यांच्या सांगण्यानुसार होत आहेत. जयंती देखिल इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी न करता तिथी प्रमाणे साजरी करतात, याचा अर्थ यांना अजून गुरु रविदास यांचा विज्ञानवादी विचार समजला नाही. हे सनातनी लोक नाव गुरु रविदासांचे घेतात आणि काम मनुचे करतात. अशा मनुवादी लोकांपासून समाजाने सावध रहावे.
          गुरु रविदास यांचे नाव व्यवस्थित न घेता रोहिदास असे म्हटले जाते, त्यांचे गटाई करतानाचे फोटो वापरणे आणि त्यांच्या खोट्या, काल्पनिक आणि चमत्कारी गोष्टी सांगणे हा गुरु रविदासांचा अपमान आहे असे सांगून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, गुरु रविदासांनी आरी, रापीच्या साह्याने नाही तर लेखणीच्या बळावर क्रांती केली, म्हणून अरी रापी, देव, दैव, पोथी, पंचांग, ब्राह्मण यावर अवलंबून न राहता शिक्षणाची कास धरावी. शासन, प्रशासन व सत्तेची सूत्रे हाती घेण्याचा प्रयत्न करावा.
            सर्वप्रथम सर्व महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक कालवश मारोतराव पिसाळ यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार घालून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
            याप्रसंगी बाल वक्ते ओंकार सोनटक्के, पुनम वाघमारे, पूजा सोनटक्के तसेच रामराव पिसाळ, व्यंकटराव दुधम्बे यांनीही मनोगत व्यक्त केले. मंचावर परभणी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. अरुणाताई कोंडिबा सोनटक्के, पूर्णा पंचायत समितीच्या सदस्या श्रीमती रुक्मिनबाई मारोतराव पिसाळ, माजी सभापती शिवसांब  देशमुख, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक गजानन पाटील, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा वंजे, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक गंगाधर पिसाळ, युवा कार्यकर्ते शिवराज कांबळे, हणमंत उतकर, सरस्वतीबाई पाटील, निलाबाई शिखरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
           या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोंडिबा सोनटक्के, राम वाघमारे, नारायण सोनटक्के, अशोक वाघमारे, गजानन वाघमारे, शंकर दुधमल, सुधीर गोडबोले आदींनी परिश्रम घेतले. सर्वप्रथम गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेची गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. स्नेहभोजना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.