भोकर :(प्रतिनिधी ) उमरी येथील विलास गणपतराव देशमुख यांच्यावर उमरी पोलीस स्टेशन अंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यात त्यांचा जामीन अर्ज भोकर येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
       तर ता.भोकर पांडुरना येथील मुख्याध्यापक माधव शिंदे आणि रामकिशन शिंदे यांचा सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रकरणातील अटकपूर्व जामिनाचा अर्ज  न्यायालयाने फेटाळून लावला आहे, घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, उमरी येथील एल.आय.सी.एजंट रमेश सुभानजी गंगासागरे  उमरी बसस्थानका शेजारी असलेल्या बोडके पाटील यांच्या  किराणा दुकानात एल.आय.सी.च्या कामानिमित्ताने दि, 17 फेब्रुवारी 2020 रोजी गेले असता, तेथे विकास अधिकारी विलास देशमुख हे, त्या ठिकाणी येऊन एलआयसी एजंट असलेल्या रमेश गंगासागरे यांना जातिवाचक व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून 3 फूट उंच असलेल्या ओट्यावरून  लाथ मारून खाली पाडले व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यावरून त्यांच्यावर उमरी पोलीस ठाण्यात दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तसेच कलम 323, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तेव्हापासून विकास अधिकारी देशमुख हे फरार झाले आहेत, त्यांनी फरार राहून अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी भोकर येथील श्री एम.एस.शेख यांच्या जिल्हा न्यायालयात वकिलामार्फत विनंती अर्ज सादर केला होता, त्या अर्जावर काल दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली असून न्यायालयाने विकास अधिकारी देशमुख यांना जामीन नाकारून त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.
       कोर्टाने एल.आय.सी.एजंट असलेल्या फिर्यादी रमेश गंगासागरे यांना प्रत्यक्ष कोर्टात हजर राहून आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडावे या आशयाचे पत्र दिल्यावरून त्यांनी ॲडव्होकेट पी.बी.लोखंडे, आणि पी.बी.मेंडके यांच्या मार्फत आपले म्हणणे कोर्टापुढे सादर केले, कोर्टाने सरकारी वकील राजूरकर आणि फिर्यादीच्या वकिलाचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीस जामीन नाकारला आहे.
       तर दुसऱ्या प्रकरणात तालुका भोकर येथील  पांडुरना गावातील ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रकरणात आरोपी मुख्याध्यापक माधव शिंदे आणि त्यांचे बंधू सहशिक्षक रामकिशन शिंदे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज काल दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायाधीश श्री एम एस शेख यांनी फेटाळून लावला आहे.