नांदेड : (रमेश गंगासागरे )  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नूतन च्या मुख्याध्यापकाने इसवी सन 2017 - 18 मध्ये अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीची व शालेय गणवेशाची  लाखो रुपयांची रक्कम विद्यार्थ्यांना न देता इतर कामासाठी वापरल्याने त्यांच्यावर मोठी कारवाई होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.

       घटनेबाबत वरिष्ठांकडून समजलेली थोडक्यात माहिती अशी की, गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2020 रोजी नांदेड येथील जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा, सभापती संजय बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, ती अनेक कारणाने गाजली, त्यात भोकर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा नुतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने सन 2017-18 मधील अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीची 48000 हजार व शालेय गणवेशाचे 1 लाख असे मिळून 1 लाख 48 हजार रुपयांचा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना लाभ देणे अपेक्षित असताना तो दिला नाही, तसेच सदरची रक्कम इतर कामासाठी वापरण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेचे सदस्य साहेबराव धनगे यांनी  उपस्थित केला, याप्रकरणी मुख्याध्यापकाची चौकशी केली असल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला मात्र यावर साहेबराव धनगे त्यांचे समाधान झाले नाही, त्यांनी पुन्हा सभापती यांच्या अधिपत्याखाली इतर दोन विभागातील अधिकाऱ्यांना नेमून चौकशी करावी अशी मागणी लावून धरली. त्यामुळे सदरील मुख्याध्यापकाची पुन्हा त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी होनार असल्याचे कळते, तसेच भोकर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मुधोळकर यांनी वैद्यकीय रजा, बाल संगोपन रजा, वेतन देयक, शाळा तपासणी अशा अनेक कामात दिरंगाई केल्याच्या तक्रारी प्राप्त असल्याने, त्या अनुषंगाने त्यांची सुद्धा चौकशी करण्याची मागणीही साहेबराव धनगे यांनी केली, जिल्हा परिषदेच्या 85 टक्के शाळा डिजिटल झाले असतानाही विज बिल अदा करण्यासाठी रक्कम उपलब्ध नसल्याने विद्युत पुरवठा केला जात नसल्याचेही साहेबराव धनगे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
       विद्यार्थ्यांचे 1 लाख 48 हजार रुपये विद्यार्थ्यांना न देताच इतर ठिकाणी सदरील रक्कम वापरणाऱ्या मुख्याध्यापकाच्या विरोधात आता अनेक पालक जागरूक झाले असल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहेत, त्यामुळे सदरील प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची चर्चा  भोकर शहरात होत आहे.