भोकर :(रमेश गंगासागरे ) हिमायतनगर जि. नांदेड येथे मागील वर्षी घडलेल्या बाललैंगिक अत्याचार खटल्याचा आज निकाल लागला असून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

       सदरील घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, हिमायतनगर येथील आरोपी व फिर्यादी हे एकाच गल्लीत राहणारे असून फिर्यादीची मुलगी वय 8 वर्षे ही, दि. 16 मार्च 2019 रोजी घरासमोर थांबलेल्या ऑटो मध्ये संध्याकाळी  पाच वाजताच्या दरम्यान खेळत असतांना आरोपी नामे बालाजी देवकते वय 43 वर्षे, यांने सदरील मुलीस आमिष दाखवून जवळच असलेल्या खड्ड्यामध्ये नेऊन आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केले, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी दिसत नसल्याने इतरस्त्र शोधाशोध केली पण मुलगी दिसून आली नाही, एका तासानंतर मुलगी घराकडे रडत येत असताना फिर्यादी व इतर लोकांनी पीडित बालिकेस विचारणा केली असता, तिने बालाजी देवकते याने अत्याचार केल्याचे सांगितले, त्यावरून फिर्यादी अशिया बी वय पन्नास वर्ष राहणार हिम्मयतनगर, हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 26 /2019 कलम 376 अ ,ब भादवि 4 ,6 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला, या गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले, तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या व पीडित मुलींच्या जबाबावरून भोकरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री,एम.एस. शेख यांनी आरोपीस कलम 376 मध्ये जन्मठेप व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये दोषी ठरवत, आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तसेच 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यात सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली, सदरील घटनेचा तपास तत्कालीन तपास अधिकारी डी. एस. काळे पोलीस उपनिरीक्षक यांनी केला, तर पैरवी अधिकारी म्हणून श्री काकडे यांनी मदत केली.