भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील बसस्थानकाला जवळपास 44 वर्षांचा कालावधी लोटला असून आता ते जीर्ण झाले आहे, हे जीर्ण झालेले बसस्थानक पाडून त्या जागी प्रवाशांच्या सोईसाठी नवीन अत्याधिक सोई असलेल्या बसस्थानकाची निर्मिती करण्यात यावी या आशयाचे निवेदन एसटी कर्मचारी विकास कृती समिती भोकर यांच्यातर्फे राज्याचे बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांना दिले आहे.

       दिनांक 11 जानेवारी रोजी भोकर येथे राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी भोकर येथील एसटी कर्मचारी विकास कृती समिती तर्फे निवेदन देण्यात आले आहे, दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोकर बसस्थानकाला पुरेशी जागा असून ह्या रिकाम्या जागेचा काहीच उपयोग होत नाही, या जागेचा योग्य पद्धतीने वापर करून जागेत एसटी कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात यावीत.
जीर्ण झालेले हेच ते भोकर चे बसस्थानक
 
       तसेच सध्या उपलब्ध असलेल्या बसस्थानकात पावसाळ्याचे पाणी येत असल्याने प्रवाशांना इथे थांबणे अवघड जात आहे तसेच या बसस्थानकात सर्वांसाठी अपुऱ्या सोयी असल्यामुळे हे बसस्थानक पाडून त्या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी चांगल्या दर्जाचे बसस्थानक बांधून देण्यात यावे तसेच भोकर ते हैदराबाद जाणारी बस ही नियमित करावी, भोकर बसस्थानकाला नवीन दहा बसेस उपलब्ध करून द्याव्यात भोकर बसस्थानकात चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून निवेदनावर कर्मचारी विकास कृती समिती च्या वतीने चालक ताजोद्दीन त्यांची स्वाक्षरी आहे.