भोकर : (रमेश गंगासागरे ) भोकर ते म्हैसा राज्यरस्त्यावर पोमनाळा पाटीजवळ एक तेलाचा टँकर पलटी झाल्याने त्यातील तेल मोठ्या प्रमाणावर सांडून गेले, हे तेल मिळवण्यासाठी रस्त्याने जाणारा जो-तो नागरिक केविलवानी धावपळ करतांना दिसून आला, सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही मोठी दुखापत झाली नाही.

       काल संध्याकाळी दि,4 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोमनाळा पाटीजवळ तेलंगाणा येथून तेल घेऊन महाराष्ट्रामध्ये आलेला टँकर क्रमांक NL - 01 - N 0016 हा अचानक पलटी झाला, त्यातील चालक प्रसंगावधान राखून उडी मारल्याने बचावला, तर क्लीनर थोडावेळ फसून बसला होता, काही नागरिकांनी तात्काळ त्याची सुटका केली, त्यास किरकोळ दुखापत झाली आहे, झालेल्या दुर्घटनेत मात्र टँकर मधील लाखो रुपयांच्या तेलाला मोठी गळती लागली होती, सर्व तेल सांडून जात असल्याचे पाहून रस्त्याने जाणारा येणारा नागरिक तेल भरून घेण्यासाठी धडपडत होता, तेलाने सगळा रस्ता न्हाऊन गेला होता, तेलाचा टँकर उलटल्याची बातमी काही क्षणात वाऱ्यासारखी आजूबाजूच्या खेड्यात पसरली, आणि बघता बघता हातात मिळेल ते भांडे घेऊन तेल मिळवण्यासाठी नागरिक धावून आले, रात्री उशिरापर्यंत नागरिक सांडलेले तेल गोळा करत होते.