भोकर :- (रमेश गंगासागरे ) भोकर व तालुक्यातील खेड्यापाड्यात काँग्रेस, भाजपा, व वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांसह स्वतः उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यावर जास्त भर दिला जात असल्याने भोकर विधानसभेची ही निवडणूक मोठी चुरशीची व प्रतिष्ठेची बनत चालली आहे.

       काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपा कडून बापूसाहेब देशमुख गोरठेकर तर वंचित बहुजन आघाडी कडून नामदेव आयलवाड यांच्यात अटीतटीचा सामना होत असल्याने हे तिन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी तन- मनाने कामाला लागल्याचे चित्र विधानसभेत सगळीकडे दिसून येत आहे. ह्या तीनही पक्षाचे कार्यकर्ते पण मोठ्या आवडीने प्रचार करत असून पंधरा ते वीस जणांचे टोळके गल्ली गल्ली-बोळात पत्रके वाटत व आपल्याच उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करत फिरत आहेत. तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोण विजय होतो याकडे लक्ष लागलेले असतानाच काल बारड येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी मोठी प्रचारसभा घेऊन बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे तर काँग्रेसचे अशोक चव्हाण हे भोकर विधानसभेत तळ ठोकून वाडी तांड्यावर जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यावर भर देत असल्याने ही निवडणूक आता अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.