भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील भारतीय स्टेट बँकेत अंधाधुंद कारभार वाढत चालला असून खातेदारांना बँकेतील व्यवहार करण्यासाठी चार चार तास ताटकळत उभे रहावे लागत असल्याने शेतकरी, महिला, पुरुष, विद्यार्थी, व जेष्ठ नागरिकांना मोठा त्रास होतांना दिसून येत आहे.
       प्रत्येक शासकीय कामासाठी सरकारने नागरिकांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात सक्ती केली असल्याने स्वतःच्या खात्याला आधार नंबर जोडण्यासाठी नागरिक या बँकेत तोबा गर्दी करत आहेत, विहित नमुन्यामध्ये सर्व कागदपत्रांनिशी अर्ज दिल्यावरही महिना-महिना येथील कर्मचारी खात्याला आधार कार्ड लिंक करत नाहीत, खातेदाराने दिलेली कागदपत्रे कचरा कुंडीत टाकून देत आहेत, याबाबत विचारणा केली असता, दुसरे कागदपत्रे आणून द्यावे लागतील म्हणून जबाबदारी झटकून टाकत आहेत, त्यामुळे खातेदारांना जास्तीचा भुर्दंड लागून मानसिक त्रास होत आहे, मात्र बँकेच्या दलाल मार्फत आलेल्या अर्जाचा तात्काळ विचार केला जात असल्याने येथील कर्मच्याऱ्याचे दलालाशी लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. म्हणून येथील कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरूनच अंकुश ठेवण्यात यावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. यापूर्वी सुद्धा या बँकेत अनेक नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने करून सुद्धा काही सुधारणा झाली नसल्याने येथील कर्मचाऱ्यांनी एका विद्यार्थ्यांच्या खात्यातून अचानक दहापट जास्त रक्कम ट्रान्सफर केली असल्याने त्या विद्यार्थ्याने सदरील बँकेच्या मॅनेजरला जिल्हा ग्राहक मंचात ओढल्याचे ताजे उदाहरण आहे, बँकेतील कर्मचार्‍याच्या वागण्यात सुधारणा न झाल्याने यानंतरही तीव्र आंदोलने होतील अशी शक्यता व्यक्त केल्या जात आहे.