भोकर :(रमेश गंगासागरे ) माझ्या शिक्षण संस्थेत  मी कधीच राजकारण केले नसून  विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून नवनवीन अभ्यासक्रम आणून विद्यार्थ्यांचे जीवन घडविले आहे, असे मत माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी शाहू विद्यालय भोकर येथील  पालक मेळाव्यामध्ये काढले.
       भोकर येथील शाहू विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर  गुरुवार दिनांक  5  सप्टेंबर रोजी  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, पालक मेळाव्याची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वन करून झाली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथराव बन्नाळीकर होते तर मंचावर कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी, विनायकराव कुळकर्णी, शिवाजीराव किन्हाळकर, जि.प. सदस्य दिवाकर रेड्डी, धर्मराज देशमुख, गणपत पिठेवाड, राजेश्वर आलेवाड, अनुराधा खांडरे, गिरीष भाऊ गोरठेकर, सतीश देशमुख, माधव पा.वडगावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 
   या पालक मेळाव्यात शाळेतील दहावी व बारावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी, विशेष प्राविण्यासह राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय खेळांमध्ये विशेष प्राविण्यप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मानचिन्ह देवून त्यांना गौरविण्यात आले. यावेळी माजी आ. बापूसाहेब देशमुख गोरठेकर पुढे म्हणाले की, अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये योग्य शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे, शाळा बंदपडून शिक्षकांवर समायोजनाची वेळ येत आहे. यास शिक्षकच जबाबदार आहेत, कारण त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले असते तर विद्यार्थ्यांचा खाजगी शाळेकडील ओढा कमी झाला असता, असे सांगून शाहू विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करुन बदलत्या काळाप्रमाणे संस्थेच्या वतीने प्रभावी शिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी पालकांना व शाळेला लौकिकता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे शेवटी सांगितले. प्रास्ताविक शाळेचे उप मुख्याध्यापक संजय देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन आर.आर. जोंधळे आणि जी.पी. साब्दे यांनी केले. आभार शेख सलीम सर यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पालक मेळाव्यास हजारो पालकांनी उपस्थिती लावली होती.