नांदेड : (रमेश गंगासागरे )  शहरातील काही खाजगी कोचिंग क्लासेसवर आयकर खात्याने आज धाडी टाकल्या. पोलीस बंदोबस्तात आयकर विभागाने ह्या धाडी टाकल्या आहेत. या धाडीमुळे खाजगी कोचिंग क्लासेस चालकांनी विद्यार्थ्यांना ऐनवेळी सुट्टी दिलीय.  गेल्या दोन दिवसांपासून आयकर खात्याचे पथक नांदेड मध्ये ठाण मांडून आहे. शहरात असणाऱ्या सर्वच खाजगी कोचिंग क्लासेस सध्या आयकर खात्याच्या रडारवर आहेत, त्यामुळे हजारो रुपये फिस देऊनही विद्यार्थ्याना बळजबरीची सुट्टी देण्यात आलीय.
     
       मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी नांदेडमध्ये मोठया संख्येने खाजगी क्लासेस आहेत. हे क्लासेस चालक एका विद्यार्थ्यांकडून एका विषयाला 25 ते 50 हजार अशी फिस वसूल करतात. विशेष म्हणजे एकावेळी एका वर्गात चारशे ते पाचशे विद्यार्थ्याना बसवत असतात. त्यातून क्लासेस चालक वर्षाला कोट्यावधी रुपयाची कमाई करतात. मात्र त्या तुलनेत सरकारकडे आयकर किंवा सेवाकर भरत नाहीत. त्यातून आयकर खात्याचे अधिकारी नेहमीच या क्लासेसवर धाडी टाकत असतात. या धाडी नंतर काही कारवाई झाल्याचे आजपर्यंत ऐकण्यात नाही. मात्र या धाडी दरम्यान आपली विद्यार्थी संख्या कळू नये यासाठी क्लासेसचालक क्लासला सुट्टी देऊन मोकळे होत असतात.
        आज बाबानगर भागातील एका क्लासेसवर आयकर अधिकारी आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर लगेच इतर क्लासेस चालकांनी सावध होत आपल्या क्लास ला सुट्टी देऊन टाकलीय. विद्यार्थ्याकडून हजारो रुपये फिस आकारनारे हे क्लास चालक नियमांचे पालन करत नाहीत त्याचा मनस्ताप विद्यार्थ्याना सहन करावा लागत आहे.
               जीव मुठीत धरून ज्ञानार्जन….
       नांदेड मधले बहुतांश क्लासेस हे जीवघेणे आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना अपवादानेच आढळतात. क्लासेस ची जागा इमारत सर्व काही असुरक्षीत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाने बोंबाबोंब आहे मात्र तरीही विद्यार्थी इथं रग्गड फिस देऊन शिकायला राज्यातुन नांदेडला येत असतात, याकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे.