भोकर :-(रमेश गंगासागरे ) काल दिनांक 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येस भोकर पंचायत समितीच्या आवारात नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत भोकर येथील एक ग्रामसेवक व सरपंच महिलेचा पती जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.
       
       घटनेबाबत हाती आलेली माहिती अशी की, पेट्रोल पंपाच्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवक विकास भारती व सरपंच महिलेचा पती वागतकर यांनी पैशासाठी अडवणूक केली होती, व नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी मुदखेड येथील एका व्यक्तीकडे केली होती, तडजोडीनंतर तीस हजार रुपये देण्याचे तिघांमध्ये ठरले होते, परंतु तक्रारदार व्यक्तीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती, त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी 9 ऑगस्ट रोजी याची पडताळणी केली व 14 ऑगस्ट रोजी ग्रामसेवक विकास भारती आणि सरपंच महिलेचा पती वागतकर यांना 30 हजार रुपयांची लाच भोकर पंचायत समितीच्या आवारात स्विकारताना रंगेहात पकडले, ही कारवाई यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे, पोलीस उपअधीक्षक संपते, पोलीस निरीक्षक बि.व्ही. गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी एकनाथ गंगातीर्थ, दर्शन यादव, सचिन गायकवाड, अंकुश गाडेकर, अनिल कदम यांनी काम केले, यातील दोन्ही आरोपींना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेऊन त्यांना नांदेडकडे तात्काळ घेऊन गेल्याने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला भोकर मध्ये विविध चर्चेला उधाण आले होते, यापूर्वीसुद्धा घरकुलाचे बिल काढण्यासाठी तक्रारदाराला लाचेची मागणी करताना येथील वाघमारे नावाच्या कर्मचाऱ्याने लाच मागितली होती, याच पद्धतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली होती, त्यानंतरची ही भोकर पंचायत समितीमधील दुसरी घटना आहे.