भोकर :-(रमेश गंगासागरे ) लाल बहादुर शास्त्री शिक्षण संस्था उमरी संचलित श्री, शाहू महाराज विद्यालय भोकरने तब्बल 36 वर्षानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशात बदल केला आहे, त्यामुळे शाळेचे रूप सध्या पालटले असून विद्यार्थी अधिक उत्साही आणि आनंदी दिसत आहेत.
       
शाळेच्या नवीन गणवेशात विद्यार्थी
       गोरठेकर घराण्याने गंदेवार कॉलनीत 1983 रोजी भाड्याच्या जागेत कुडाच्या चार खोल्यात लावलेले हे रोपटे आता 36 वर्षाचे झाले आहे, त्यावेळेस शाळेचा गणवेश खाकी रंगाचा पॅन्ट आणि पांढरा शर्ट असा होता, तोच गणवेश आजपर्यंत कायम होता, 36 वर्षाच्या कार्यकाळात भोकरच्या शाहूविद्यालयने पाच मुख्याध्यापक अनुभवले असून त्यात सर्वश्री तुप्तेवार सर, देशमुख सर, तोडे सर, कुलकर्णी मॅडम आणि संजय देशमुख कामनगावकर, यांचा समावेश आहे, यात पाचवे मुख्याध्यापक वगळता पूर्वीच्या एकाही मुख्याध्यापकांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचा गणवेश बदलला नव्हता, आता विद्यमान मुख्याध्यापक संजय देशमुख कामनगावकर यांच्या प्रयत्नाने गणवेशात बदल करण्यात आला असून 1 ऑगस्‍ट 2019 पासुन येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी नवीन गणवेशात दिसत आहेत, त्यामुळे तब्बल 36 वर्षांनी शाहूने कात टाकली, असे म्हटल्यास आता वावगे ठरणार नाही.
       
       36 वर्षांच्या कालखंडात भोकर येथील शाहूने अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविले असून यात अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत आहेत, इयत्ता दहावी आणि बारावी निकालाच्या बाबतीत भोकर येथील शाहूने दरवर्षी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून स्वतःचे विक्रम स्वतःच मोडत आहे. तसेच मे महिन्यात लागलेल्या इयत्ता पाचवी व आठ्वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालामध्ये शाहूचे तब्बल 16 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले होते, ही बाब अभिनंदनीय आहे. 36 वर्षांच्या काळात शाहूने मोठी प्रगती केल्याचे दिसून येते, सुसज्ज इमारतीसह शाहू विद्यालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे यासाठी मुख्याध्यापक संजय देशमुख कामंगावकर यांनी अथक परिश्रमातून मिनरल वाटर ची व्यवस्था केली आहे, तर स्वच्छतेच्या बाबतीत जागोजाग कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत.आणि आता तर गणवेशात बदल करून शाळेने नवीन रूप परिधान केले आहे. शाहूच्या या वैशिष्ट्यपूर्ण बाबींमुळे शाहू विद्यालयाची तालुक्यात सर्वत्र  चर्चा होत आहे.