भोकर : (रमेश गंगासागरे ) आपल्या विविध जनहितार्थ मागण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा भोकर ने रणशिंग फुंकले असून गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी भोकर तहसीलवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
![]() |
| संग्रहित छायाचित्र |
वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात सात मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे नमूद केले असून त्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
1) तामिळनाडू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या देशद्रोह यावर कठोर कार्यवाही करा, 2) दिल्ली येथील संत रविदास महाराजांचे मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या जातिवाद यावर कठोर कार्यवाही करून मंदिर पूर्ववत बांधून द्या, 3) शेतकर्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सात-बारा कोरा करा, 4) भोकर तालुक्यासह नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, 5) भोकर शहरासह तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे ऊर्ध्व पैनगंगेचे पाणी भोकरच्या सुधा प्रकल्पात आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, 6) रोजगार हमीची कामे सुरू करून मजूर व बेकारांच्या हाताला कामे द्या, 7) विधवा निराधार व अपंगाचे तुटपुंजे मानधन वाढवून प्रतिमहिना 2000 रुपये मानधन देण्यात यावे,
![]() |
| संग्रहित छायाचित्र |
यासह प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, भारताला स्वातंत्र्य मिळूनही जातीय वर्णव्यवस्थेच्या नावाखाली धर्मांध शक्ती डोके वर काढून देशात अराजकता माजवीत आहे, तामिळनाडूमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करून विटंबना करण्यात आली, तसेच यापूर्वीही दिल्ली येथील संसद भवनाजवळ सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी देशाचा सर्वोच्च ग्रंथ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रति जाळलेल्या आहेत, परवाच दिल्ली येथील तुगलकाबाद मधील पुरोगामी विचाराचे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे मंदिरही जातीयवादी लोकांनी पाडले आहे, दलित व्यक्ती मंदिरात आणि विहिरीवर गेल्यास बाट झाला म्हणून त्यास बेदम मारहाण करून धिंड काढल्या जात आहे, भारतीय संविधानाने सर्वांना लोकशाही स्वातंत्र्य दिले असताना जुनाट, विकृत, बुरसटलेल्या संस्कृतीला चिकटून बसलेले आरक्षण विरोधी लोक, दलित आदिवासी अल्पसंख्यांक भटके-विमुक्त मागासवर्गीय समूहावर अन्याय-अत्याचार करीत आहेत दुसरीकडे दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, मराठवाड्यात पाऊस न पडल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, शेतकरी दुबार पेरणी करूनही सर्वकाही वाया गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे, दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे, प्रस्थापित राज्यकर्ते स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता आपल्याकडेच राहावी म्हणून इकडून तिकडे अन तिकडून इकडे कोलांट्या उड्या मारीत आहेत, त्यांना जनतेच्या सुखदुःखा विषयी काहीही देणेघेणे नाही अशा ढोंगी बगळ्या पासून जनतेने सावधान राहिले पाहिजे असेही पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे, पत्रकामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रपुरुष, संत-महात्मे, थोर समाज सुधारक हे कोणत्याही एका जाती-धर्माचे नसतात ते सर्वांचेच मार्गदर्शक असतात, तामिळनाडूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व दिल्ली येथे पाडण्यात आलेले संत रविदास मंदिर या घटना अत्यंत निंदनीय असून मानवतेला काळिमा फासणाऱ्या आहेत, म्हणून सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आव्हान शेवटी प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.


0 Comments