भोकर :(रमेश गंगासागरे ) तालुक्यात सर्वत्र निष्पक्षपाती पणे तसेच तन-मन-धनाने निस्वार्थपणे सेवा करण्याचे काम भोकर येथील सेवा समर्पण टीम करत असून तिचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले ते सेवा समर्पण टीमने आयोजित कौतुक मेळाव्यामध्ये बोलत होते.
       पाणी फाउंडेशन ने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेल्या कोळगाव, पांडुरना व रेनापुर आदी गावकऱ्यांचे कौतुक करण्यासाठी भोकर येथील सेवा समर्पण टीमने दत्त गडावर आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी एका मेळाव्याचे आयोजन केले होते, या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून भोकर तहसीलचे तहसीलदार श्री भरत सूर्यवंशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री रामोड, तालुका कृषी अधिकारी व्ही.बी. गीते, वनपाल बालाजी पेरेवार, जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी, बाळासाहेब पाटील रावणगावकर, पंचायत समितीचे उपसभापती सुरेश बील्लेवाड, डॉ.यु.एल. जाधव, प्रा. व्यंकट माने, संपादक रमेश गंगासागरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबुराव सायाळकर, दत्त गडाचे महाराज उत्तमबन आणि शांतीबन महाराज आदींची उपस्थिती होती, पुढे बोलताना तहसीलदार म्हणाले की, भोकर शहरात व तालुक्यात अत्यंत चांगल्या सामाजिक संघटना कार्यरत असून त्या आपापल्या परीने लोकसहभागा मध्ये स्वखर्चाने सामील होत असल्याचे पाहून मी, चांगल्या शहरात नोकरी करत आहे, याचा मला सार्थ अभिमान होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या, कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील रावनगावकर, व दिवाकर रेड्डी यांनी विजेत्या गावांना भरघोस पारितोषीक देण्याचे आवाहन केले गटविकास अधिकारी रामोड यांनी ही आपले विचार व्यक्त केले.
       जास्वंदाच्या रोपट्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलदान करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याच कार्यक्रमामध्ये  विजेत्या  गावांना  मान्यवरांच्या हस्ते सेवा समर्पण टीमच्या वतीने पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. तर दैनिक पुढारीने काढलेली विशेष पुरवणी 'यशोगाथा जलसंधारणाची' चे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री तुमवाड सर यांनी केले, सूत्रसंचलन प्रा. कुमरे सर यांनी केले तर आभार पत्रकार विठ्ठल फुलारी यांनी मांडले कार्यक्रमास कोळगाव, पांडुरना आणि रेनापुर तेथील असंख्य नागरिक उपस्थित होते, या सर्वांना अल्पोपहाराची व शुद्ध पाण्याची सोय सेवा समर्पण टीमने केली होती हे विशेष.