भोकर :-(रमेश गंगासागरे ) पदवी स्तरावरील अभ्यासक्रम निश्चित करताना विद्यार्थ्यांना स्किलवर आधारित आणि कालानुरूप बदल असलेली अभ्यासक्रम निश्चित करणे आवश्यक असल्याचे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी व्यक्त केले,   ते येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात गणित, संख्याशास्त्र, जैवभौतिकशास्त्र याविषयीच्या नवीन पुनर्र्चित अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेच्या उदघाटनासाठी आलेे होते.
       यावेळी प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या संपुर्ण वाटचालीचा आढावा उपस्थिताना सांगितला. यावेळी महाविद्यालयाच्या वार्षिक अंक वेदन आणि डॉ सतीश चव्हाण यांच्या गणित विषयाच्या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू च्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मीरा जोशी यांनी तर कार्यशाळेबाबत ची माहिती डॉ सतीश चव्हाण, डॉ माधव फेंगडे,डॉ अरविंद चव्हाण, प्रा व्यंकटेश जाधव,डॉ सचिन तावडे,यांनी दिली. कार्यशाळेसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रांतील 100 च्या वर प्रतिनिधी उपस्थित होते.
      यावेळी डॉ किन्हाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी दर्जेदार अभ्यासक्रम निश्चित करावेत त्याच बरोबर समाज मूल्याना जोपासणारे असावेत तरच चांगला माणूस घडू शकेल.दिवसेदिवस सामाजिक मूल्यांची होत असलेले घसरण चिंताजनक होत आहे. यावर वेळीच शैक्षणिक व्यवस्थेने लक्ष घातले नाही तर समाजाचे अधःपतन रोखणे अवघड होईल आणि झालेल्या भौतिक विकासाला अर्थही राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ माधवराव पाटील किन्हाळकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य डॉ वैजयंता पाटील,तसेच वरील तिन्हीही विषयाच्या अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर पवार,डॉ दत्तात्रय पवार,डॉ सतीश कुलकर्णी उपस्थित होते. कुलगुरू पुढे म्हणाले की, प्रत्येक विषयात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम जो विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देऊ शकेल,असे तयार झाले पाहिजे. तरच विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकेल आणि त्या विषयाचे महत्वही टिकून राहील .अभ्यासक्रमात आपण कालानुरूप बदल नाही केले तर येणाऱ्या पिढीला स्पर्धेत टिकता येणार नाही. अभ्यासक्रम निश्चित सकारात्मक परिणाम घडवून आणणारे असतील तरच विद्यार्थ्यांचे,पर्यायाने समाजाच्या विकासासाठी पूरक ठरतील अन्यथा त्यातून विद्यार्थी आणि समाज दोघांचेही नुकसान होईल.