भोकर :-(रमेश गंगासागरे ) भोकर शहरासह तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे अनेक रोग उद्भवत असून अनेक नागरिकांना साथीच्या रोगाने झपाटले आहे, त्यामुळे सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची तोबा गर्दी झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
       
       यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शहरासह तालुक्यात असलेले नदी नाल्याना डबक्याचे स्वरूप आले आहे, त्यावर डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने त्याचा परिणाम नागरिकावर दिसून येत आहे, नागरिकांना डास चावल्यामुळे डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया, हिवताप, यांची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे दिसून येत आहेत, अशी लागण झालेले रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी गर्दी करत आहेत, अशा रुग्णांना खाजगी डॉक्टर महागडी औषधी लिहून देत असल्याने आधीच दुष्काळाच्या छायेत असलेला नागरिक व शेतकरी कंगाल होताना दिसून येत असल्याची चर्चा भोकर शहरात होत आहे, ह्या साथीच्या रोगाची लागण होण्यापूर्वीच संबंधित विभागाने शहरात व गल्लोगल्लीत उपाययोजना करणे गरजेचे होते  पण आजपर्यंत संबंधित विभागाने कुठल्याच प्रकारच्या उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत, या साथीच्या रोगावर संबंधित कार्यालयांनी तातडीच्या उपाय योजना करावयात, असेही सुजान नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.
       सध्या शहरात डासा बरोबरच माशांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याने शहराततील हॉटेल्स मध्ये विक्री होणाऱ्या उघड्यावरील खाद्यपदार्थावर ह्या माशा मोठ्या प्रमाणात बसत असल्याने अशी अनेक हॉटेल्स साथीच्या रोगाची कारण बनत आहेत, अशा अस्वच्छ हॉटेल्सवर ही तात्काळ कार्यवाही करावी व फॉगिंग मशीनने शहरात व गल्लीबोळात धूर फवारणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.