भोकर :-(रमेश गंगासागरे ) शेतात होणारी सततची नापिकी, आणि वरून बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत दिवशी (बु.) येथील एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
       
       सदरील घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिवशी येथील तरुण शेतकरी नामे संतोष चोखोबा कदम वय वर्ष 35 यांनी शेतात होणारी सततची नापिकी आणि वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यांना कंटाळून रविवार दिनांक 21 जुलै 2019 रोजी स्वतःच्या शेतात कोणतेतरी विषारी औषध पिल्याची खबर लागताच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांना भोकर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले, पण संतोष कदम यांनी उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्राणज्योत मावळली अशाप्रकारे तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने व तालुक्यातील भुरभुसी व कोळगाव नंतर ही शेतकऱ्यांची तिसरी आत्महत्या असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
       काही वर्षापूर्वीच संतोष कदम यांचे वडिलांचे छत्र हरवले होते, त्यांच्या कुटुंबात पत्नी एक मुलगा एक मुलगी, आई असा परिवार आहे कदम अल्पभूधारक असल्याने त्यांच्या शेतीमधून अत्यंत अल्प प्रमाणात उत्पादन होत असे. यामुळेच ते कर्जबाजारी झाल्याचे परिसरात बोलले जात आहे.
       भोकर पोलीस स्टेशनला संतोष कदम यांची पत्नी संगीताबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.