काळ्याबाजारात रेतीचा भाव 24 हजार रुपये 1 ट्रक
भोकर :- (रमेश गंगासागरे ) भोकर नगर परिषदे अंतर्गत गरीब लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून सध्या रेती उपलब्ध होत नसल्याने या गरिबांना घरकुला पासून वंचित राहावे लागत असल्याची खंत अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत भोकर तालुक्यात गरीब व सामान्य नागरिकांना अडीच लक्ष रुपयांचे घरकुल मंजूर झाले आहे, आता आपले स्वप्नातले हक्काचे घर मिळेल या आशेने अनेक नागरिक आपल्या जागेची साफसफाई करून घरकुल बांधण्याच्या तयारीत असतानाच, यावर्षी रेती तर उपलब्ध होतच नाही, पण बांधकाम करण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध होत नसल्याने, अनेक लाभार्थ्यांनी आज पर्यंत घरकुल बांधण्यास सुरुवात केली नाही, तर काही लाभार्थ्यांनी तहसीलदार भोकर यांना शासनाच्या जीआर प्रमाणे 5 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देऊन घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली आहे, काळ्याबाजारात रेतीचा भाव आज घडीस 24 हजार रुपये एक ट्रक असल्याने तसेच विटांचे भावही वाढले असल्याने अडीच लक्ष रुपयात घरकुल कसे बांधावे ह्या विवंचनेत लाभार्थी अडकला आहे, शासनाने त्वरित ह्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी रेती (वाळू ) अल्पदरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

0 Comments