भोकर : (रमेश गंगासागरे )  भोकर हिमायतनगर रोडवर परवा झालेल्या मोटरसायकल अपघातात दोन नागरिकांचा बळी गेल्या प्रकरणी नियमाला बगल देऊन रोडचे काम करणाऱ्या गुत्तेदारावर  मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भोकर पंचायत समितीचे उपसभापती सुरेश बील्लेवाड यांनी वरिष्ठाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
     

   
        विशेष प्रकारचे कार्यकारी अभियंता आणि पोलीस निरीक्षक भोकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोकर ते किनवट जाणारा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून नोंदला गेलेला आहे, ह्या रोडवर भोकर पासून जवळच असलेल्या सुधा नदीवर पुलाचे बांधकाम चालू आहे, असे असताना वाहतुकीसाठी वळण रस्ता काढलेला असताना ह्या रस्त्यावर नामफलक नाहीत, दिशादर्शक रेडियम पट्ट्या नाहीत, हा रस्ता कच्चा असून यावर पुरेसे पाणी टाकले जात नसल्याने प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट उडत आहेत,  त्यामुळे ह्या रोडवर छोटे-मोठे अपघात दररोज होत आहेत, अशातच दिनांक 5 मे रोजी हिमायतनगर येथील सवना या गावचे दोन नागरिक या रोडवर हकनाक बळी गेले आहेत, त्यामुळे ह्या रोडचे काम करणाऱ्या त्या गुत्तेदारावर गुन्हा दाखल करून मयताच्या वारसांना आर्थिक मदत करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून आता वरिष्ठ या निवेदनावर कोणती भूमिका घेतात ह्याकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.