भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदेड रोड वरील आमदरीच्या तलावात सध्या 60 टक्के पाणी उपलब्ध आहे तर सुधा नदीमध्ये केवळ 15 ते 20 टक्के पाणी उपलब्ध आहे हे दोन्ही तलाव भोकर वासियांना पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत, असे असताना रमजानच्या महिन्यात नगर परिषदे मार्फत मागील दीड महिन्यापासून शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येऊन नागरिकांना वेठीस धरण्यात येत आहे.
भोकर शहरातील अर्ध्या भागात दोन दिवसाआड तर दुसऱ्या अर्ध्या भागात दोन दिवसा आड असे आळीपाळीने पाणीपुरवठा करण्यात येत असताना मागील दोन दिवसांपासून शहराला अचानक निर्जळी चे स्वरूप आले आहे, त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असल्याचे चित्र भोकर शहरातील समता नगर, फुलेनगर, सहिद नगर, भीम टेकडी, शास्त्रीनगर आदी भागात दिसून येत आहे, याबाबत नगरपरिषदेतील मुख्याधिकारी श्री बागुल यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, काही तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा बंद असून तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम चालू आहे, तांत्रिक अडचण दूर होताच लवकरच शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल असे ते म्हणाले.
शहरात काही गल्ल्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई चालू असतानाही नगरपरिषदेने टँकर मार्फत पाणी पुरवठा चालू न केल्यामुळे शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे, त्यामुळे नगर परिषदे मार्फत तात्काळ आमदरीच्या तलावातून शहराला पाणीपुरवठा करावा व शहरातील काही भागात टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांची होणारी पायपीट दूर करावी अशी मागणी होत आहे.

0 Comments