भोकर :- (रमेश गंगासागरे ) 
                    पाणी फाउंडेशन ने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेसाठी भोकर तालुक्यातील बहुसंख्य खेड्यांनी सहभाग नोंदवला असून दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी भोकर तालुक्यातील पांडुरना या गावी महाश्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्यानिमित्ताने भोकर शहरातून आज 30 एप्रिल संध्याकाळी सहा वाजता जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.              
        या महाश्रमदानासाठी सामाजिक संस्था, डॉक्टर, पत्रकार, वकील यासह विविध संघटनांनी एकत्र येऊन पांडुरना येथे महाश्रमदान करण्यासाठी यावे असे निमंत्रण ग्रामपंचायत कार्यालय पांडुरना, भोकर विकास मंच, भोकर तालुका मेडिकल असोसिएशन, शिक्षक संघटना यांनी केले आहे. पाणी बचतीचा ध्यास घेतलेल्या पाणी फाउंडेशन ने भोकर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी बचतीचे कार्य हाती घेतले असून यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, पांडुरना गावी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन तहसीलदार भरत सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी केले आहे. महाश्रमदानासाठी जवळपास पाच ते सात हजार नागरिक पांडुरना येथे येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने व ग्रामपंचायतीने याठिकाणी मोठी व्यवस्था करण्यासाठी पावले उचलली आहेत, येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पांडुरना ग्रामपंचायतचे ज्येष्ठ सदस्य माधवराव शिंदे, गावचे सरपंच यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर कार्य हाती घेऊन दररोज सकाळ-संध्याकाळ कामे करत असल्याने लवकरच गाव पाणीदार होईल असे वाटत आहे.
      भोकर शहरातून निघणारी रॅली ही शासकीय विश्रामगृह या ठिकाणावरून सुरुवात होऊन ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, महादेव मंदिर, लहुजी चौक, शिवाजी चौक मार्गे तहसील जवळ येऊन रॅलीचे विसर्जन होईल तरी सर्व नागरिक व जल प्रेमींनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.