भोकर : (रमेश गंगासागरे ) भोकर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री प्रसन्न वराळे हे दिनांक 21 एप्रिल रोजी रविवारी सकाळी दहा वाजता येत असून त्यांच्या शुभहस्ते अनेक सामाजिक कार्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
मागील दोन वर्षांपासून न्यायदाना बरोबरच भोकरच्या जिल्हा न्यायालयाने विविध सामाजिक उपक्रम राबविले असून यात कायदेविषयक शिबिर, वयोवृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबिर तसेच अनेक गंभीर आजारातील रुग्णांसाठी मुंबई, पुणे येथील मोठ्या दवाखान्यात मोफत इलाजासाठी रुग्ण पाठवून माणुसकीचा प्रत्यय दिला आहे.
भोकर चे जिल्हा न्यायाधीश श्री मुजीब शेख हे भोकर येथे आल्यापासून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले असल्याने भोकर जिल्हा न्यायालयाचे नाव राज्यामध्ये चर्चिले जात आहे. त्यामुळे अल्पावधीतच भोकर येथील जिल्हा न्यायालयाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेत माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री कुलकर्णी यांनी वेळोवेळी भोकर येथील न्यायालयात भेट देऊन श्री मुजीब शेख यांच्या कार्याची पावती दिली होती आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री प्रसन्न वराळे हे दिनांक 21 एप्रिल रोजी रविवारी सकाळी 10 वाजता भोकर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात येत असून यांच्या शुभहस्ते अभियोक्ता संघ भोकर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची ओळख व विविध सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत भारतीय वकील परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्री, सतीश देशमुख तसेच वकील परिषद महाराष्ट्र व गोवा यांचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्री, आशिष देशमुख हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे सदरील कार्याक्रमास भोकर व भोकर तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments