भोकर :(रमेश गंगासागरे ) नांदेड लोकसभेच्या निवडणुकीतला रंग आता भोकर तालुक्यात दिसू लागला असून गळ्यामध्ये विविध पक्षाच्या दस्त्या टाकून प्रचार करणारे नवीन चेहरे जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहेत.
अडगळीला पडलेले छोटे-मोठे जुने कार्यकर्ते आता एकत्र असले असून, ते गल्लीबोळात, वाडी तांड्यावर तसेच गावा- गावात भर उन्हात फिरताना दिसत आहेत, "आमच्याकडे थोडं राहू द्या लक्ष", असे म्हणत मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराच्या कार्याला लागल्याचे दिसत आहेत. प्रचार करणाऱ्या मध्ये आपल्या पक्षाचा कोण आणि इतर कोण हे ओळखण्यास मात्र कार्यकर्त्यांना कमालीचा त्रास होत आहे, कारण काही बेरोजगार तरुण डबल शिफ्ट मध्ये काम करताना मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत, सध्या तालुक्यात रोजगार हमी योजनेचे कामे सुरू न झाल्याने अनेक तरुण आणि गावकरी बाजूच्या तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर कामाला जात आहेत, तर इथे राहिलेले काही बेरोजगार तरूण मात्र, आज एका पक्षाचा तर उद्या दुसऱ्याच पक्षाचा प्रचार करताना म्हणजेच डबल शिफ्टमध्ये काम करताना दिसून येत आहे,
त्यामुळे अनेक मतदार तोंडावर दस्ती ठेवून हसत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे, नांदेड लोकसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची निवडणूक होत असल्याने यामध्ये निश्चित कोणता उमेदवार निवडून येईल हे आत्ताच सांगणे कठीण होऊन बसले आहे, कारण बीजेपीचे प्रताप पाटील चिखलीकर, काँग्रेसचे अशोकराव चव्हाण आणि वंचित आघाडीचे यशपाल भिंगे हे तिन्ही उमेदवार तगडे असल्याने त्यांनी आपापल्या परीने मोठी प्रचार यंत्रणा उभी केली असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि उत्कंठावर्धक होणार असल्याची चर्चा भोकर तालुक्यामध्ये सगळीकडे होत आहे. प्रचार करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांची ज्या - त्या नेत्याने बरीच सोय केली असल्याने दिवसभर गाडीत आणि संध्याकाळी धाब्यावर असे चित्र आता तालुक्यामध्ये सगळीकडे दिसू लागले आहे.


0 Comments