भोकर : (रमेश गंगासागरे )  तालुक्यातील हळदा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत ८ मार्च शुक्रवारी जागतिक दिनाच्या औचित्याने महिला मेळावा घेण्यात येऊन त्यांना नारीशक्तीच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यात आली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. वंदनाताई याटेवाड या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच सौ. भारतबाई भोसले ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.मायाबाई किसवे, उपाध्यक्षा सौ. रेखाताई आर्लेवाड सुपरवायझर सौ. एम.जी. पांडे आदींची उपस्थिती होती.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सर्वांनी पूजन करून आपल्या पाल्यांना नियमित शाळेचा युनिफॉर्म घालून शाळेत दररोज हजर ठेवणाऱ्या मातांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महिला जागृतीबाबत शाळेत वेळोवेळी विविध उपक्रम राबवणाऱ्या शिक्षिका सौ. एस.आर.मंडलापुरे, सौ. एस.एम. रामदीनवार, सौ.एन.एल.मिटकरी, सौ. एस. एम. सावंत या शिक्षीकांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच वंदनाताई याटेवाड व इतर मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.
        मेळाव्यात स्त्री कर्तुत्वाचा जागर करण्यात येऊन देशाच्या व विश्वाच्या इतिहासात स्वतःच्या सामर्थ्याने छाप उमटविणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, देशाच्या पहिल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, पहिल्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, अंतराळ कन्या कल्पना चावला, किरण बेदी आदींच्या संघर्षमय जीवनावर शिक्षिका सौ.मंडलापुरे मॅडम यांनी प्रकाश टाकून आपणही स्वतःचा आत्मविश्वास जागा करून अद्वितीय कार्य करू शकतो. कारण "जिच्या हाती पाळण्याची दोरी| तीच जगाते उद्धारी" या न्यायाने आपण आपल्यासह आपल्या घराचा आपल्या गावाचा व आपल्या देशाचा उद्धार करू शकतो हे ताकद आपल्या सर्व नारी मध्ये आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
   या मेळाव्यात सरपंच वंदनाताई याटेवाड, अंगणवाडीच्या सुपरवायझर पांडे मॅडम यांनीही उपस्थित महिलांना स्त्री शक्तीची जाणीव आपल्या भाषणातून करून दिली व जीवनात येणाऱ्या अडचणींना न घाबरता संघर्ष करून आपण स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहिले पाहिजे असा मोलाचा संदेश दिला.
        या महिला मेळाव्यास शाळेतील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण माता, गावातील विविध बचत गटांच्या महिला. हळदा केंद्रातील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, यांच्यासह १००च्या वर महिला उपस्थित होत्या. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ईबितवार सर, शिंदे सर, व्यवहारे सर आदींनी मोलाचे योगदान दिले.