भोकर : (रमेश गंगासागरे )  
         गेल्या अनेक वर्षापासून भोकर ते बोरगाव कडे जाणार्‍या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याकडे संबंधितांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
       बोरगाव भोकरच्या उत्तर दिशेला असून भोकर पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे, बोरंगावकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून त्यावरून गाड्या धावणे तर सोडाच पायी चालणे कठीण झाले आहे, जागोजागी रस्ता उखडून गेल्याने मोठे खड्डे पडले आहेत, हयावरून वाहने जाताना अनेक वेळा पंचर होत आहेत, तर अनेक वेळा गाड्या घसरून पडण्याचे प्रकार या रस्त्यावर घडलेले आहेत, पूर्वी बोरगावला जाण्यासाठी फक्त पाच मिनिटाचा अवधी लागत होता, पण आता रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने भोकरहुन बोरगावला जाण्यासाठी 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागत आहे, त्यामुळे शाळेला जाणारे विद्यार्थी, दवाखान्यात उपचार घेण्यासाठी जाणारे रुग्ण यांना कमालीचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे, गावकऱ्यांनी रस्ता तयार करून देण्यासंबंधित  भोकर येथील संबंधित कार्यालयाला अनेकवेळा निवेदने दिल्यावरही या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे, त्यामुळे येथील रस्ता तात्काळ पूर्ण करून त्यावर डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी बोरगाव येथील नागरिक करत आहेत.